राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते तथा आमदार धनंजय मुंडे यांच्या एका वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. परळीमधील एका कार्यक्रमात बोलताना धनंजय मुंडे यांनी केलेल्या भाषणात काही सूचक भाष्य केलं आहे. त्यामुळे धनंजय मुंडे हे पुन्हा एकदा मंत्रिमंडळात ‘कमबॅक’ करणार का? अशा चर्चांनी जोर धरला आहे.

‘सर्व क्षेत्रातलं आपलं वजन कमी झालं होतं. पण येणारा काळ आपलाच आहे, चमत्कार दाखवावा लागेल’, असं सूचक वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याचा नेमकं अर्थ काय? यावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत.

धनंजय मुंडे काय म्हणाले?

“मी स्वतः जीम करत आहे. बऱ्यापैकी मी माझं वजन कमी केलं आहे, तसंही सर्वच क्षेत्रातलं आपलं वजन कमी झालं होतं. मात्र, येणारा काळ आपला आहे आणि त्या काळात आपण चांगलं फिट राहायला पाहिजे. त्यासाठी मी आता जीम करत आहे. कारण गेल्या एक ते दीड वर्षांत जीवातले जिवलग सहकारी मित्र देखील मला भेटल्यावर एकच प्रश्न विचारायचे. भाऊ तब्येत कशी आहे? मी ते ऐकून-ऐकून परेशान झालो होतो. मग मी म्हटलं की आता आपला चमत्कार दाखवावा लागेल”, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

“जीम करत आहे, पण कामाच्या व्यापामध्ये कधीतरी कमी जास्त होत आहे. मात्र, वकील साहेब आता एक सभा आपल्याला अशी करायची आहे. त्या सभेत मी भाषण करणार नाही, तर या वयात देखील आपण शारीरिक दृष्ट्‍या किती सुदृढ आहोत, हे सभेतील लोकांना आपलं शर्ट काढून दाखवायचं आहे. माझी तब्येत कशी आहे हे तुम्ही विचारलं, त्यामुळे माझी तब्येत अशी आहे हे त्यांना दाखवायचं आहे”, असंही धनंजय मुंडे यांनी मिश्किलपणे म्हटलं आहे.