राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते तथा आमदार धनंजय मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी परळीमधील एका कार्यक्रमात बोलताना केलेल्या एका वक्तव्याची मोठी चर्चा रंगली होती. ‘सर्व क्षेत्रातलं आपलं वजन कमी झालंय. पण येणारा काळ आपलाच आहे आणि चमत्कार दाखवावा लागेलच’, असं सूचक भाष्य धनंजय मुंडे यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर धनंजय मुंडे हे पुन्हा एकदा मंत्रिमंडळात ‘कमबॅक’ करणार का? अशा चर्चांनी जोर धरला होता.
त्यानंतर आता धनंजय मुंडे यांनी वर्कआऊट करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये मुंडे यांनी काही काव्यपंक्ती लिहित राजकीय पुनरागमनाचे संकेत दिल्याची चर्चा पुन्हा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ‘काटे खोलवर रुतले, तरी पाऊल पुढे टाकतो आहे’, अशा काव्यपंक्ती लिहित धनंजय मुंडे यांनी वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.
मागील काही काळापासून धनंजय मुंडे हे सक्रिय राजकारणापासून काहीसे दूर आहेत. बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडच नाव समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती, त्यानंतर धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हापासून मुंडे हे सक्रिय राजकारणापासून काहीसे दूर आहेत.
धनंजय मुंडेंच्या वर्कआऊट व्हिडीओची चर्चा
धनंजय मुंडे यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून जीमममध्ये वर्कआऊट करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये धनंजय मुंडे हे जीममध्ये व्यायाम करताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत.
धनंजय मुंडेंनी पोस्टमध्ये काय म्हटलं?
काटे खोलवर रुतले आहेत, तरी पाऊल पुढे टाकतो आहे…भेगाळलेले पाय आणि घायाळ मन, अजूनही धैर्य टिकवून आहे…निंदा-दूषणे आता न भिडती, अडखळत मार्ग काढतोच आहे…हरवण्याची आता बिशाद कुणाची, स्वतःशी सुद्धा लढतो आहे…
असं धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या या पोस्टचा नेमका अर्थ काय? त्यांना या पोस्टच्या काव्यपंक्तीमधून काही संकेत द्यायचे आहेत का? किंवा या माध्यमातून ते काही राजकीय पुनरागमनाचे संकेत देत आहेत का? याबाबत आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.
धनंजय मुंडेंनी ‘कमबॅक’ करण्याचे दिले होते संकेत
आमदार धनंजय मुंडे यांच्या एका वक्तव्याची काही दिवसांपूर्वी राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली होती. परळीमधील एका कार्यक्रमात बोलताना धनंजय मुंडे यांनी केलेल्या भाषणात काही सूचक भाष्य केलं होतं. ‘सर्व क्षेत्रातलं आपलं वजन कमी झालं होतं. पण येणारा काळ आपलाच आहे, चमत्कार दाखवावा लागेल’, असं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलं होतं.
“मी स्वतः जीम करत आहे. बऱ्यापैकी मी माझं वजन कमी केलं आहे, तसंही सर्वच क्षेत्रातलं आपलं वजन कमी झालं होतं. मात्र, येणारा काळ आपला आहे आणि त्या काळात आपण चांगलं फिट राहायला पाहिजे. त्यासाठी मी आता जीम करत आहे. कारण गेल्या एक ते दीड वर्षांत जीवातले जिवलग सहकारी मित्र देखील मला भेटल्यावर एकच प्रश्न विचारायचे. भाऊ तब्येत कशी आहे? मी ते ऐकून-ऐकून परेशान झालो होतो. मग मी म्हटलं की आता आपला चमत्कार दाखवावा लागेल. सध्या जीम करत आहे, पण कामाच्या व्यापामध्ये कधीतरी कमी जास्त होत आहे. मात्र, एक सभा आपल्याला अशी करायची आहे. त्या सभेत मी भाषण करणार नाही, तर या वयात देखील आपण शारीरिक दृष्ट्या किती सुदृढ आहोत, हे सभेतील लोकांना आपलं शर्ट काढून दाखवायचं आहे. माझी तब्येत कशी आहे हे तुम्ही विचारलं, त्यामुळे माझी तब्येत अशी आहे हे त्यांना दाखवायचं आहे”, असं धनंजय मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी बोलताना मिश्किलपणे म्हटलं होतं.
