scorecardresearch

विधिमंडळात चर्चा घडवून धनंजय मुंडे यांची कोंडी!

कायदा व सुव्यवस्थेच्या बिघडलेल्या स्थितीबाबत गृहमंत्र्यांना पत्र लिहून स्वतंत्र बैठकीची मागणी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केल्यानंतर राष्ट्रवादीतील तीन आमदारांनी तारांकित प्रश्न मांडत विधिमंडळात चर्चा घडवून आणली.

(प्रातिनिधिक छायाचित्र)

कायदा व सुव्यवस्थेची बिघडलेली स्थिती

वसंत मुंडे

बीड :  कायदा व सुव्यवस्थेच्या बिघडलेल्या स्थितीबाबत गृहमंत्र्यांना पत्र लिहून स्वतंत्र बैठकीची मागणी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केल्यानंतर राष्ट्रवादीतील तीन आमदारांनी तारांकित प्रश्न मांडत विधिमंडळात चर्चा घडवून आणली. चर्चेदरम्यान बैठक घेण्याचे व पोलीस अधीक्षकास रजेवर पाठविण्याचे आश्वासन विधिमंडळात मिळाल्याने पालकमंत्री धनंजय मुंडे यांची कोंडी होत असल्याचे राजकीय चित्र निर्माण झाले आहे. पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडे यांच्यावर नाराज असणाऱ्या सदस्यांनी चर्चा घडवून आणल्याने राष्ट्रवादीतील कुरघोडी राजकारण पुढे येत आहे.

बीड जिल्ह्यातील वाढत्या गुन्ह्यांचे प्रमाण आणि बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था यावर राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर, बाळासाहेब आजबे यांनी थेट अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला. सोमवारी विधानसभेत राष्ट्रवादीच्या आमदारांनीच सरकारला घरचा आहेर दिल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपच्या स्थानिक आमदार नमिता मुंदडा यांनी पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी यांना निलंबित करण्याची मागणी केली. आमदार सोळंके यांनी तर पोलीस अधीक्षक बदल्यांसाठी पैसे घेतात. अवैध धंद्यांवाल्यांकडून हप्ते घेतात. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली, असा गंभीर आरोप केला. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी  ही बाब गंभीर आहे, असे सांगत पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आणि पंधरा दिवसात चौकशी करून कारवाई करण्याची घोषणा केली. यामुळे पालकमंत्री धनंजय मुंडे यांची पक्षाच्याच आमदारांनी सभागृहात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करून कोंडी केल्याने मुंडे एकाकी पडल्याचे चित्र लपून राहिले नाही.

जिल्ह्यात राष्ट्रवादीचे चार आणि भाजपचे दोन आमदार आहेत. अडीच वर्षांपूर्वी धनंजय मुंडे यांच्याकडे पालकमंत्री पदाची धुरा आली.  मंत्रिमंडळात संधी न मिळाल्यामुळे सुरुवातीलाच आमदार प्रकाश सोळंके यांनी राजीनामा अस्त्र उपसले होते. तेव्हापासून जिल्ह्यातील आमदार व प्रमुख पदाधिकारी यांच्यातील छुपा संघर्ष अनेक कार्यक्रमामधून दिसून आला. काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे समर्थक जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या जागी तिन्ही आमदारांनी एकमताने मागणी करून अ‍ॅड. राजेश्वर चव्हाण यांची नियुक्ती केली. मागील महिन्यात भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी थेट गृहमंत्र्यांना पत्र लिहून बीड जिल्ह्यातील  वाढत्या चोऱ्या,  खून, मारामाऱ्या, महिलांवरील अत्याचार, घातक शस्त्रांचा वापर राजरोसपणे होत असून या गुन्हेगारीला अभय कोणाचे, असा प्रश्न करत पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला होता.

राष्ट्रवादीच्या आमदारांचा पालकमंत्र्यांवरच रोष

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी कायदा आणि सुव्यवस्थेबाबत गृहमंत्र्यांना पत्र लिहिले तेव्हा जिल्ह्याची बदनामी होते आहे, असे म्हणले जात होते. मात्र, राष्ट्रवादीच्याच आमदारांनी प्रश्न उपस्थित करून पालकमंत्र्यांवर रोष व्यक्त करून घरचा आहेर दिला. जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीला पाठिंबा कोणाचा, राज्यात सरकार राष्ट्रवादीचे, पालकमंत्री राष्ट्रवादीचे मग दोष कोणाला, असा  सवाल भाजपने उपस्थित करून धनंजय मुंडेवर निशाण साधला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dhananjay mundes dilemma discussion legislature deteriorating law and order situation ysh

ताज्या बातम्या