१५ डिसेंबर २०१७ पर्यंत राज्य खड्डेमुक्त होईल अशी घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती. याच घोषणेचा आधार घेत आता माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना खोचक टोला लगावला आहे. राष्ट्रवादीने सध्या सरकार विरोधात हल्ला बोल यात्रा सुरु केली आहे. या यात्रेदरम्यान खड्ड्यांमुळे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांना चांगलाच त्रास सहन करावा लागला. त्यामुळे या दोघांनी खड्ड्यांजवळ एक सेल्फी काढला. इतकेच नाही तर हा सेल्फी आता तूच चंद्रकांत पाटील यांना पाठव असेही अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना सांगितले.

राष्ट्रवादीची औसा लातूर येथील सभा झाल्यावर राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते निलंगामार्गे उद्गीरला निघाले होते. त्यावेळी अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यासह कार्यकर्त्य्यांनाही सहन करावा लागला. रस्त्यांची अक्षरशः चाळणी झालेली पाहून अजित पवार आणि धनंजय मुंडे पाहणीसाठी खाली उतरले. त्याचवेळी अजित पवार यांना खासदार सुप्रिया सुळे यांनी #selfiewithpotholes अभियानाची आठवण करुन दिली. मला काही ते सेल्फी जमत नाही असे अजितदादा म्हटले. पण लगेच त्यांनी धनंजय मुंडेंना बोलावले आणि तू सेल्फी काढून चंद्रकांत पाटील यांना पाठव अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी #selfiewithpotholes हे अभियान सुरु केले. माध्यमांनीही या अभियानाची दखल घेतली त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी डेडलाईन १५ जानेवारी पर्यंत वाढवली. मात्र ती डेडलाईनही उलटून गेली आहे. मराठवाड्यातल्या रस्यांवर आजही खड्डे बघायला मिळाले. त्याचमुळे धनंजय मुंडे आणि अजित पवार यांनी सेल्फी घेतला. खड्ड्यांच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारला धारेवर धरल्याचे बघायला मिळाले. आता यावर चंद्रकांत पाटील काय उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मागील वर्षी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ]खड्डा दाखवा हजार रुपये मिळवा’, असे आवाहन केले होते. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी #selfiewithpotholes ही मोहीम सुरु केली. त्याचीच आठवण या दोघांनाही सुप्रिया सुळे यांनी करून दिली. मग धनंजय मुंडे आणि अजित पवार यांनी खड्ड्यांसोबत सेल्फी काढला आणि चंद्रकांत पाटील यांना हा सेल्फी तूच पाठव असे म्हणत अजित पवारांनी सरकारवर खोचक शब्दात टीका केली.