धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याच्या मागणीसाठी औरंगाबाद, बीड व परभणीसह मराठवाडय़ात ठिकठिकाणी चक्काजाम करण्यात आला. बीड जिल्ह्य़ातील केज, धारुरमध्ये बंद पाळण्यात आला. तर, परभणी जिल्ह्य़ातील जिंतूर, गंगाखेड, पाथरी, राणीसावरगाव आणि देवगाव फाटा येथे झालेल्या आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत झाली. पश्चिम महाराष्ट्रात पुणे, बारामती, इंदापूर, पंढरपूर येथेही आंदोलनामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता.
बीड- पाटोदा, माजलगांव येथे दोन तास चक्काजाम आंदोलन करून धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.  धारुर आणि केजमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. परभणी शहरासह जिल्ह्यातील जिंतूर, गंगाखेड, पाथरी, राणीसावरगाव आणि देवगाव फाटा या ठिकाणी झालेल्या आंदोलनामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
 उत्तर महाराष्ट्रातही धनगरांच्या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला.  
 पुणे जिल्ह्यात बारामती, इंदापूर येथे आंदोलक रस्त्यावर उतरले. पुणे शहरात महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली पुणे-मुंबई महामार्गावर चांदणी चौक येथे निदर्शने करण्यात आली.  मुंबईतही आंदोलकांनी कुर्ला स्थानकात रेलरोको केल्याने मध्य रेल्वेची वाहतूक १५ मिनिटे विलंबाने सुरू होती.
  फलटण येथे आंदोलकांनी नाना पाटील चौकात आंदोलन करत असताना एसटी बस स्थानकात घुसून बसवर दगडफेक केली. बस नियंत्रण कक्षाचीही मोडतोड केली. दगडफेकीमुळे दोन शाळकरी मुलींसह एक महिला जखमी झाली. िहसक आंदोलनामुळे फलटण शहर ताबडतोब बंद झाले.