बुधवारचा दिवस भारतीयांसाठी अभिमानाचा ठरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत अंतराळात महाशक्ती ठरल्याचे सांगितले. लो अर्थ ऑर्बिटमध्ये एका लाइव्ह सॅटेलाईटला भारताच्या अँटी सॅटेलाइटने अवघ्या तीन मिनिटांत पाडले. त्यानंतर देशभरातून वैज्ञानिकांवर कौतुकाची थाप टाकली जात आहे. काँग्रेसने वैज्ञानिक आणि मोदी सरकारचे अभिनंदनही केले आहे. अशातच यावरून राष्ट्रवादीचे नेते धनजंय मुंडे यांनी मोदी सरकारला टोला लगावला आहे. निवडणुकींच्या तोंडावर श्रेय लाटू नका असे मुंडें यांनी ट्विट करत टोला लगावला आहे. मुंडे यांनी DRDO ने केलेल्या कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन ही केले आहे.

चौकीदार आज १५ लाख, निरव मोदी, मल्ल्या, दाऊद, राफेल यावरील मौन सोडेल असं वाटलं होतं. वैज्ञानिकांचा अभिमान आम्हाला आहेच. पण यात तुमचे योगदान काय? अंतराळत एअर स्ट्राईक केल्याचे सांगून निवडणुकींच्या तोंडावर श्रेय लाटू नका म्हणजे झालं. असे ट्विट केले आहे.

(आणखी वाचा : वैज्ञानिकांचे कर्तृत्व मोदींच्या तोंडी कशाला ? : राज ठाकरेंचा सवाल)

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी देशवासियांना संबोधित केले. भारताकडून क्षेपणास्त्राद्वारे एक उपग्रह पाडण्यात यश आले असून अशा स्वरुपाची कामगिरी करणारा भारत हा चौथा देश ठरल्याची माहिती मोदींनी दिली. आम्ही ही मोहीम कोणत्याही देशाविरुद्ध राबवली नाही. आम्ही भारताच्या नागरिकांची आणि देशाची सुरक्षा यासाठी ही मोहीम राबवली. आम्हाला जगात शांतता कायम ठेवायची आहे, आमचा युद्धाचा हेतू नाही, असे त्यांनी सांगितले.

(आणखी वाचा : अंतराळात भारताचे ‘मिशन शक्ती’, शत्रूराष्ट्रांच्या उपग्रहांना देणार ‘टक्कर’)

काँग्रेसने केली स्तुती –

काँग्रेसने या कामगिरीबद्दल वैज्ञानिक आणि मोदी यांचे कौतुक केले आहे. त्यांनी म्हटलं आहे की, आम्ही भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे आणि सरकारच्या या नव्या कामगिरीबद्दल अभिनंदन. भारतीय अंतराळ संशोधनाला पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंनी प्रोत्साहन दिले होते. त्यानंतर माजी पंतप्रधान इंदिरा गांधीनी इस्रोची स्थापना केली. इंदिरा गांधींनी नेहमीच देशाची मान उंचावण्याची कामगिरी केली होती.