MP Omraje Nimbalkar Shivsena Rebellion Reason: शिवसेनेचा ६० वर्धापनदिन साजरा होत असताना उद्धव ठाकरेंच्या सेनेला पुन्हा एकदा हादरा बसत आहे. २०२२ साली झालेल्या मोठ्या फुटीनंतर आता पुन्हा एकदा ९ पैकी ६ खासदार पक्ष सोडणार आहेत. पक्षाच्या बैठकीला गैरहजर राहून जवळपास याची निश्चिती झाली आहे. सहा खासदारांपैकी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या बंडखोरीची सर्वाधिक चर्चा होत आहे. निष्ठेबाबत निंबाळकर यांनी केलेली भाषणे, त्यांची आक्रमकता यावरून त्यांना ट्रोलही केले जात आहे. बंडखोरीचा निर्णय का घेतला? याबाबत आता त्यांनी थेट भाष्य केले आहे. तसेच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबाबत मोठे विधान केले आहे.

किती दिवस कोरड्या हाताने फिरायचे?

ओमराजे निंबाळकर यांनी दिव्य मराठी या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपली भूमिका मांडली आहे. भावनिकदृष्ट्या विचार केल्यास पक्ष सोडण्याचा निर्णय चुकीचा वाटतो. पण राजकीयदृष्ट्या विचार केल्यास मी बरोबर आहे. मी सध्या पुण्यात असून २० जूनला वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येच्या खटल्याचा निकाल लागल्यानंतर धाराशिवमध्ये कार्यकर्त्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेऊ, असे निंबाळकर म्हणाले.

दिव्य मराठीशी बोलताना ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या निर्णयामागची अगतिकता सांगितली. ते म्हणाले, “समोर सत्ता आणि पैसा आहे. तर माझ्याकडे फक्त निष्ठा आहे. निष्ठा असूनही जर लोकांची कामे करता येत नसतील तर लोकांसमोर कसे जायचे? शेवटी कोरड्या हाताने मी कधीपर्यंत फिरणार? त्यामुळे माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता.”

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंबद्दल काय म्हणाले?

ठाकरे गटातून बाहेर पडण्याच्या निर्णयाबाबत सांगत असताना निंबाळकर यांनी महायुती आणि ठाकरे गटातील फरक सांगितला. ते म्हणाले, “या दोन्हींमध्ये मोठा फरक आहे. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांचे इतके आमदार निवडून आल्यानंतरही ते शांत बसलेले नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. सध्या विधानपरिषदेच्या निवडणुकीतही ते फिरत आहेत.”

उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीविषयी बोलताना निंबाळकर म्हणाले, “प्रकृती अस्वास्थ्यामुळे उद्धव ठाकरे यांना फिरणे शक्य नाही, हे समजू शकतो. पण किमान आदित्य ठाकरेंनी फिरायला हवे होते. कार्यकर्त्यांना ताकद दिली पाहिजे होती. पण दुर्दैवाने असे झाले नाही.”

आर्थिक व्यवहारातून पक्षांतर?

ठाकरे गटाच्या खासदारांच्या बंडखोरीमागे आर्थिक व्यवहार असल्याचा आरोप ठाकरे सेनेतून होत आहे. संजय राऊत यांनी त्याबद्दल विविध दावे केले आहेत. यावर दिव्य मराठीच्या मुलाखतीमध्ये प्रश्न विचारला असता ओमराजे निंबाळकर यांनी आर्थिक व्यवहाराच्या चर्चा खोट्या असल्याचे म्हटले.

“पैसे घेतल्याची चर्चा खोटी आणि तथ्यहीन आहे. माझ्यासाठी सत्ता आणि पैसा नेहमीच गौण राहिले आहेत. हा निर्णय पैशांसाठी नाही, तर मतदारसंघातील विकासकामे आणि अपेक्षेने पाहणाऱ्या मतदारांसाठी आहे”, अशी प्रतिक्रिया ओमराजे निंबाळकर यांनी दिली.

कोण आहेत ओमराजे निंबाळकर?

मराठवाड्यातील शिवसेनेचे तरूण तडफदार नेते अशी ओमराजे निंबाळकर यांची ओळख आहे. २०२४ साली लोकसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या (ठाकरे) तिकीटावर सलग दुसऱ्यांदा दणदणीत विजय मिळवला. या अटीतटीच्या लढतीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) च्या उमेदवार अर्चनाताई पाटील (राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी) यांचा तीन लाख २९ हजार ८४६ मतांनी पराभव केला होता.

ओमराजे निंबाळकर यांना सात लाख ४८ हजार ७५२ तर अर्चना पाटील यांना चार लाख १८ हजार ९०६ इतकी मते मिळाली.

खासदार होण्यापूर्वी, २००९ च्या विधानसभा निवडणुकीत ते उस्मानाबाद (धाराशिव) मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आले होते. वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी ते आमदार झाले होते.

ओमराजे यांचे वडील दिवंगत पवनराजे निंबाळकर हे एक प्रबळ राजकीय नेते होते (ज्यांची २००६ मध्ये राजकीय वैमनस्यातून दुर्दैवी हत्या झाली होती). वडिलांच्या निधनानंतर ओमराजे यांनी अत्यंत तरुण वयात राजकारणात प्रवेश केला आणि जनसामान्यांशी घट्ट नाळ जोडली.