MP Omraje Nimbalkar Social Media Followers Drop: धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत पक्षात प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चांनंतर, आता सोशल मीडियावर त्यांना अनफॉलो करण्याचा एक मोठा ट्रेंड सुरू झाला आहे. अवघ्या दोन दिवसांत तब्बल १५ हजार फॉलोअर्सनी त्यांना अनफॉलो केले असून, ही घट अद्यापही सुरूच आहे.
नेटकऱ्यांचा संताप; कमेंट्समधून येत आहेत तिखट प्रतिक्रिया!
ओमराजे निंबाळकर यांची सोशल मीडियावर प्रचंड मोठी फॅन फॉलोइंग आहे. त्यांच्या अधिकृत अकाऊंट्सवर नजर टाकल्यास:
- एक्स (ट्विटर): २९ हजार ९०० फॉलोअर्स
- फेसबुक: ६ लाख ८ हजार फॉलोअर्स
- इन्स्टाग्राम: ५ लाख ६४ हजार फॉलोअर्स
- युट्युब: १ लाख ३६ हजार सबस्करायबर्स
आता मात्र, त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंचा हात धरण्याच्या हालचाली सुरू केल्याचे वृत्त येताच चाहत्यांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. नेटकऱ्यांनी त्यांच्या अधिकृत अकाऊंट्सवर कमेंट्सचा पाऊस पाडत आपला तीव्र संताप व्यक्त केला आहे.
ओमराजेंचा पुण्यात मुक्काम अन् व्हीपचे उल्लंघन
ओमराजे निंबाळकर गुरुवारी दुपारपर्यंत पुण्यातच ठाण मांडून होते. उद्धव ठाकरे गटाकडून व्हीप बजावूनही ते बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे ते शिंदे सेनेत जाणार यावर आता एकप्रकारे शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जात आहे. या राजकीय घडामोडींवर त्यांचे समर्थक कार्यकर्ते “पोपट मेला आहे, फक्त जाहीर करणे बाकी आहे,” अशी सूचक प्रतिक्रिया देत आहेत.
“ओमराजे गद्दारी करू नका”, सोशल मीडियावर फॉलोअर्स नेमक्या काय प्रतिक्रिया देत आहेत?
राजीनाम्याची मागणी: ओमराजेंनी आधी आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि मगच दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान फॉलोअर्सनी दिले आहे.
ठाकरेंची साथ: संकटकाळात उद्धव ठाकरेंनी ओमराजेंना मोठी साथ देऊन आमदार आणि खासदार केले, याची आठवण करून दिली आहे.
निर्णय चुकीचा: पडत्या काळात ज्यांनी मदत केली त्यांनाच सोडून जाण्याचा ओमराजेंचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा आणि कृतघ्नपणाचा असल्याचा सूर अनेक कमेंट्समध्ये दिसून येत आहे.
वडिलांच्या हत्याकांडाच्या निकालानंतर भूमिका जाहीर करणार!
“मी सध्या पुण्यात असून शिंदेसेनेमध्ये जाण्याचा निर्णय माझे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याकांडाचा अंतिम निकाल लागल्यानंतरच घेईन,” असे त्यांनी स्पष्ट केले आहे. ते २० जून रोजी आपली अधिकृत भूमिका जाहीर करणार असल्याचे समजते.
