Raju Shetti on Dharashiv Farmers beaten by Police : धाराशिवमध्ये पवनचक्कीच्या वादात शेतकऱ्याला पोलिसांकडून मारहाण झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. यावरून शिवसेनेचे (ठाकरे) आमदार कैलास पाटील व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी पोलीस प्रशासन व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर संताप व्यक्त केला आहे. कैलास पाटील यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. पोलीस कोणासाठी काम करतात? सर्वसामान्य जनतेसाठी की पवनचक्की माफियांसाठी? असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला आहे.

पवनचक्की व विद्युत लाइनसाठी घेतलेल्या जमिनीचा मोबदला द्या अन्यथा काम थांबवा अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली होती. तसेच शेतकऱ्यांनी काम अडवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलिसांनी शेतकऱ्यांवर अमानुषपणे लाठीचार्ज करत शेतकऱ्यांचं आंदोलन दडपलं. पोलिसांनी शेतकऱ्यांना केलेल्या मारहाणीचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहेत. राजू शेट्टी यांनी देखील एक व्हिडीओ पोस्ट करत पोलिसांवरील संताप व्यक्त केला आहे.

मोबदला न देताच शेतकऱ्याच्या जमिनीवर टॉवर उभारला : शेट्टी

राजू शेट्टी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की “अंबानींचा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी देवाभाऊ (मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस) तुमचे पोलीसच जर गुंडांची भूमिका पार पडत असतील तर शेतकऱ्याने न्याय मागायचा कुणाकडे? धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुय्कातील तांदळवाडी येथील गणेश शेरकर या शेतकऱ्याच्या जमिनीवर रिलायन्स रिन्यू पॅावर एनर्जीच्या टॅावर आणि वीजेची लाइन उभारण्याचे काम चालू आहे. शेरकर यांच्या क्षेत्रातून टॅावर व लाईन जात असल्याने त्याचा मोबदला रिलायन्स कंपनी देणार होती. अखेर मोबदला न देता टॅावर उभे केले मात्र सदर टॅावरवर लाईन (वीजेच्या तारा) टाकण्यास शेतकऱ्याने विरोध केला. यावेळी संबधित कंपनीने पोलिसांना पाचारण केले”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजू शेट्टी म्हणाले, “सदर शेतकऱ्यास मोबदला न देता कंपनीने दडपशाहीने कामास सुरवात केली. शेतकऱ्याने काम अडवल्याने पोलीस उपविभागीय अधिकारी राठोड याने सदर शेतकऱ्यावर लाठीचार्ज केला. यामध्ये गणेश शेरकर, अजय चोरघोडे, राजू कवडे यांना पोलिसांनी मारहाण केली. त्या सर्वांना रात्री दीड वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात ठेवलं त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. यादरम्यान कंपनीने उभारलेल्या टॅावरवर वीजेच्या तारा जोडण्यात आल्या. रात्री उशिरा या शेतकऱ्यांना सोडण्यात आले. अजूनही या कंपनीने संबधित शेतकऱ्यास पैसे दिलेले नाहीत”.