Dharmarao Baba Atram Daughter: “जी बापाची झाली नाही, ती तुमची काय होणार?”, मंत्री धर्मरावबाबा अत्राम यांची लेकीवर टीका!

मंत्री धर्मरावबाबा अत्राम म्हणाले, “जी मुलगी तिच्या बापाची होऊ शकली नाही, ती तुमची काय होणार आहे?”

dharmarao baba atram on daughter bhagyashree atram
धर्मरावबाबा अत्राम यांची मुलगी भाग्यश्री अत्राम शरद पवार गटात जाणार (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Dharmarao Baba Atram Daughter Joining NCP Sharad Pawar: आगामी विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने महाराष्ट्रात राजकीय कलगीतुरा सुरू झाला आहे. वेगवेगळ्या पक्षांमध्ये जागावाटप, इच्छुक, बलाबल अशा गोष्टींची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर नेमेचि येतो पावसाळा या तत्वानुसार निवडणुकांआधी होणाऱ्या पक्षांतरांनाही सुरुवात झाली आहे. त्यात सध्या चर्चेत असलेलं पक्षांतर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते व सरकारमधील मंत्री धर्मरावबाबा अत्राम यांची मोठी मुलगी भाग्यश्री अत्राम यांचा शरद पवार गटात होणारा प्रवेश. मुलीच्या या निर्णयावर धर्मरावबाबा अत्राम यांनी गडचिरोलीत झालेल्या जनसन्मान यात्रेतील सभेमध्ये कठोर शब्दांत टीका केली.

मुलीबद्दल काय म्हणाले धर्मरावबाबा अत्राम?

धर्मरावबाबा अत्राम यांनी बोलताना मुलगी भाग्यश्री व जावई ऋतुराज हलगेकर यांच्यावर तोंडसुख घेतलं. त्यांच्याशी संबंध संपल्याचं जाहीर करतानाच अत्राम यांनी दगा करणाऱ्यांना नदीत फेकून दिलं पाहिजे, असंही विधान केलं.

“वारे येत-जात राहतात. लोक पक्ष सोडून जात असतात. पण त्यांच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही. आमच्या घरचे काही लोक मला वापरून दुसऱ्या पक्षात जाणार आहेत. ४० वर्षं लोकांनी पक्षफोडीचे कार्यक्रम केले. आता घरफोडी करून माझ्या मुलीला माझ्याविरोधात उभं करण्याचा धंदा शरद पवार गटाचे लोक करत आहेत. त्यांच्यावर कुणीही विश्वास ठेवू नका. माझा जावई आणि मुलीवर विश्वास ठेवू नका”, असं धर्मरावबाबा अत्राम म्हणाले.

“या लोकांनी आपल्याला धोका दिला आहे. त्यांना बाजूच्या प्राणहिता नदीत सगळ्यांनी फेकून दिलं पाहिजे. हे काय चाललंय? सख्ख्या मुलीला बाजूला घेऊन तिच्या बापाच्या विरोधात उभं करत आहात. जी मुलगी आपल्या बापाची होऊ शकली नाही, ती तुमची कशी होऊ शकेल? याचा तुम्हाला विचार करावा लागेल. ती काय लोकांना न्याय देणार आहे? राजकारणात ही माझी मुलगी आहे, भाऊ आहे, बहीण आहे हे मी काही बघणार नाही”, अशा शब्दांत धर्मरावबाबा अत्राम यांनी टीका केली.

Dharmarao Baba Atram Daughter: राष्ट्रवादीच्या जेष्ठ मंत्र्याच्या घरातच फूट, मुलगी लवकरच शरद पवार गटात…सोबत जावयानेही….

“एक मुलगी गेली तरी चालेल, पण दुसर मुलगी माझ्याबरोबर आहे. माझा मुलगाही माझ्या मागे आहे. माझा एक सख्खा भाऊही माझ्यामागे आहे. माझ्या चुलत भावाचा मुलगाही माझ्या पाठीशी आहे. पूर्ण घर माझ्यामागे एकत्र झालं आहे”, असं ते यावेळी म्हणाले.

अजित पवारांचं भाग्यश्री अत्राम यांना आवाहन

दरम्यान, यावेळी भाषणात अजित पवार यांनी भाग्यश्री अत्राम यांना वेगळा निर्णय न घेण्याचं आवाहन केलं. “आख्खं कुटुंब धर्मरावबाबांच्या बरोबर आहे. एकाला त्यांनी जिल्हा परिषदेचं अध्यक्ष केलं. पण त्या आता धर्मरावबाबांच्याच विरोधात उभ्या राहायला निघाल्या. आता काय म्हणायचं याला. कुस्त्या खूप चालतात आपल्याकडे. नेहमी वस्ताद त्याच्या हाताखाली जो शिकतो, त्याला सगळे डाव शिकवत नाही. एक डाव राखून ठेवतो. बाकीचे सगळे शिकवतो. मला त्यांना सांगायचंय की अजूनही चूक करू नका. तुमच्या वडिलांबरोबर राहा”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.

Live Updates

Web Title: Dharmarao baba atram targets daughter bhagyashree joining ncp sharad pawar pmw

First published on: 07-09-2024 at 11:15 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
Show comments