गेल्या महिनाभरापासून दिल्लीच्या जंतर-मंतरवर धगधगणारं CJP – कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन अखेर एका मोठ्या राजकीय घडामोडीनं निर्णायक टप्प्यावर पोहोचलं आहे. नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणी संतप्त झालेल्या युवकांच्या आंदोलनापुढे झुकत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर शनिवारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांनी अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केल्याची माहिती दिली.

या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या ‘कॉक्रोच जनता पार्टीचे’ (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांच्यासह जंतर-मंतरवरील हजारो विद्यार्थ्यांनी या निर्णयाचे जल्लोषात स्वागत केले. या ऐतिहासिक यशानंतर अभिजीत दिपके यांच्या पालकांची पहिली अत्यंत भावूक प्रतिक्रिया समोर आली असून त्यांच्या आईला आनंदाश्रू अनावर झाले.

अभिजीतच्या आईने काय प्रतिक्रिया दिली?

“आज खूप आनंद झालाय, त्याच्या प्रामाणिकपणाला आणि कष्टाला अखेर यश आलं. गेले काही दिवस आम्हाला रात्रीची झोपही येत नव्हती. सकाळी उठल्यावर फोन हातात घेताना धडधडायचे; कोणती वाईट बातमी किंवा व्हिडिओ समोर येईल या भीतीने मन व्याकुळ व्हायचे. मी अभिजीतच्या मित्रांना फोन करून त्याच्याबद्दल विचारायचे. ते मला धीर द्यायचे आणि अभिजीतच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्यास सांगायचे.”

अभिजीतच्या आईने पुढे सांगितले की, “आधी फक्त त्याची चिंता वाटायची, पण आज डोळ्यात समाधानाचे आणि आनंदाचे अश्रू आहेत. आता त्याने लवकरात लवकर घरी यावे. तो आला की त्याला घट्ट मिठी मारेन. यापूर्वी त्याने स्वतःला ओवाळू दिले नव्हते, ‘मम्मी मी काही मोठा पराक्रम केलेला नाही’ असे तो म्हणायचा. पण आता मी त्याचे औक्षण करणार आहे. हा विजय केवळ अभिजीतचा नसून या आंदोलनात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी झालेल्या देशातील प्रत्येक विद्यार्थ्याचा आहे.”

“कोणीही जय-पराजय मानू नये”, अभिजीतचे वडील काय म्हणाले?

अभिजीतचे वडीलही या निर्णयानंतर अत्यंत भावूक झाले होते. आपल्या भावना व्यक्त करताना ते म्हणाले, “मुलांच्या रास्त मागणीला अखेर यश आले आहे. मला राजकारणातले फारसे समजत नाही. माझ्या इच्छेविरुद्ध जाऊन मुलाने हे आंदोलन सुरू केले होते. तो समाजकारणात उतरल्यामुळे एक बाप म्हणून मी खूप चिंतेत होतो. पण धर्मेंद्र प्रधान यांनी मनाचा मोठेपणा दाखवला आहे.

आजकाल कुणी साधी सरपंचाची खुर्ची सोडायला तयार होत नाही, तिथे त्यांनी एवढ्या मोठ्या मंत्रिपदाचा त्याग केला. राजीनामा देतानाही त्यांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा विचार केला, ही मोठी गोष्ट आहे. या घटनेकडे कुणीही कुणाचा जय किंवा पराजय या दृष्टिकोनातून पाहू नये.”