VIDEO: मंत्री विखेंच्या कंपनीच्या 'ब्रँड'ची बनावट दारू निर्मिती, धुळे पोलिसांची कारवाई, १ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त | Dhule Police action on illegal and fake alcohol factory arrest many | Loksatta

VIDEO: मंत्री विखेंच्या कंपनीच्या ‘ब्रँड’ची बनावट दारू निर्मिती, धुळे पोलिसांची कारवाई, १ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त

धुळ्यात पोलिसांनी बनावट दारू तयार करणाऱ्या एका कारखान्यावर कारवाई केली. या कारवाईत जवळपास एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

VIDEO: मंत्री विखेंच्या कंपनीच्या ‘ब्रँड’ची बनावट दारू निर्मिती, धुळे पोलिसांची कारवाई, १ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त
धुळे पोलिसांची बनावट दारू कारखान्यावर कारवाई (आरएनओ)

धुळ्यात पोलिसांनी बनावट दारू तयार करणाऱ्या एका कारखान्यावर कारवाई केली. या कारवाईत जवळपास एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच १० आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे आरोपींनी राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रवरा डिस्टिलरी कंपनीच्या दारूचं नाव आणि लोगोचा वापर केला होता. त्यांच्याकडून प्रवरा कंपनीच्या दारुप्रमाणे पॅकिंग केलेला मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी १० पैकी ७ आरोपींना अटक करण्यात आली, तर तिघे अद्याप फरार आहेत. त्याचाही पोलीस शोध घेत आहेत.

धुळ्यात पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे एका ट्रकवर (क्रमांक एम. एच. ४१ एयू २१२४) कारवाई केली. या ट्रकमधून अवैधरित्या दारूची वाहतूक केली जात होती. हे वाहन फागणे ते बाभुळवाडी या मार्गाने जाणार असल्याची गोपनीय माहिती धुळे तालुका पोलिसांना मिळाली. त्यावरून तालुका पोलिसांनी सापळा रचत हे वाहन अडवलं. पोलिसांनी सोपान रवींद्र परदेशी (राहणार शिरुड) याला ताब्यात घेतले. त्या ट्रकमध्ये देशी दारू संत्रा नावाचे एकूण १०० बॉक्स आढळून आले. त्यानुसार तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी बनावट दारू कारखाना केला उद्ध्वस्त

पोलिसांनी आरोपीकडे हा माल कोठून आणला याबाबत चौकशी केली असता, त्याने कावठी शिवारातील बनावट दारू कारखान्याची माहिती दिली. त्या अनुषंगाने सोनगीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कावठी शिवारात जाऊन धुळे तालुका आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकली आणि हा कारखाना उद्ध्वस्त केला.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई

गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे तालुका पोलीस आणि धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केली. विशेष म्हणजे गुजरात निवडणुकीबरोबरच धुळ्यातही १२८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे.

“गुजरातमधून स्पिरिट आणलं जायचं”

धुळे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड म्हणाले, “धुळ्यात बनावट मद्य तयार करणाऱ्या कारखान्यावर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात १० आरोपींना अटक करण्यात आले आहे. या कारखान्यात गुजरातमधून स्पिरिट आणलं जायचं आणि त्यापासून बनावट दारू तयार करून त्याचं लेबलिंग आणि पॅकिंग केलं जात होतं.”

चालकाकडून बनावट दारू तयार करणाऱ्या कारखान्याची माहिती

“एक ट्रक बनावट दारू घेऊन घेऊन जाणार आहे अशी आम्हाला माहिती मिळाली. त्यानुसार धुळे तालुक्याचे पोलीस निरिक्षक दत्ता शिंदे यांनी सापळा रचला. या कारवाईत ट्रक चालकाला अटक केल्यानंतर बनावट दारू तयार करणाऱ्या या कारखान्याची माहिती मिळाली. हा कारखाना मागील काही दिवसांपासून सुरू होता,” अशी माहिती बारकुंड यांनी दिली.

कारखान्यातून जवळपास ९८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

बारकुंड पुढे म्हणाले, “या कारखान्यातून जप्त केलेला माल जवळपास ९८ लाख रुपयांचा आहे. परंतू जप्त केलेलं ३० बॅरल स्पिरिटची दारू केली असती तर तो एकूण मुद्देमाल दीड कोटी रुपयांपर्यंत गेला असता. या प्रकरणाचा पुढील तपास धुळे तालुका पोलीस निरिक्षक दत्ता शिंदे आणि समांतर तपास एलसीबीचे हेमंत पाटील करत आहेत.”

हेही वाचा : विश्लेषण : मद्यप्राशनाची सवय सर्वात धोकादायक का आहे? जाणून घ्या

१० जणांवर गुन्हा दाखल, सातजण अटकेत, तिघे फरार

या कारवाईतील मुख्य आरोपी धुळ्यातील कावठी गावातील सरपंच महिलेचा पती असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे सरपंच महिलेच्या पतीकडूनच हा बनावट दारूचा कारखाना सुरू असल्याचं निष्पन्न झालंय. पोलिसांनी या कारवाईदरम्यान १० जणांवर गुन्हा दाखल केला. त्यापैकी सात जणांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. यातील तिघे आरोपी सध्या फरार आहेत. फरार आरोपींचा तपास आता पोलीस करीत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 17:41 IST
Next Story
राज्यपालांबाबत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा उदयनराजेंना सल्ला; म्हणाले, “महाराष्ट्रात व साताऱ्यात दंगा करून आंदोलन करण्यापेक्षा…”