दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात पोलीस कारवाईविरोधात देशभरात भडका उडाला आहे. अनेक राज्यात रस्त्यावर आले असून, ठिकठिकाणी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. दिल्लीत झालेल्या पोलिसांच्या कारवाईवर धुरळा सिनेमाचा दिग्दर्शक समीर विद्धांस यानेही चीड व्यक्त केली आहे.

नागरिकत्व कायद्यात दुरूस्ती केल्यानंतर ईशान्येत झालेला उद्रेक हळूहळू देशभर पसरू लागला आहे. रविवारी राजधानी दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात आंदोलक विद्यार्थी आणि पोलीस आमनेसामने आले. यावेळी पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचे पडसाद सोमवारी देशभरात उमटू लागले आहेत. आयआयटी मुंबईसह देशातील अनेक शैक्षणिक संस्थामधून कायद्याला विरोध होऊ लागला आहे. लखनऊतील नदवा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी निदर्शनं सुरू केली.

नागरिकत्व कायदा आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर सिनेक्षेत्रातील कलाकारही भूमिका घेऊन मत मांडतांना दिसत आहे. धुरळा या मराठी सिनेमाचा दिग्दर्शक समीर विद्धांसनं हे सगळं वेदनादायी असल्याचं म्हटलं आहे. “आपण ह्या देशाचे नागरिक आहोत. सरकारच्या एखाद्या निर्णयाविरोधात मत मांडण्याचा/आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. तो घटनेनं दिलेला आहे. शांततापूर्ण चाललेल्या आंदोलनाला ‘चिरडणं’ आणि इतकं भीषण पद्धतीने चिरडणं हे भयानक आहे. आणि जर ह्यात कोणाला काहीच चूक वाटत नसेल तर ते अजून जास्त भयानक आहे. आत्ता जे काही देशात चालू आहे ते खूप वेदनादायी आहे,” असं विद्धांस म्हणाला.

यापूर्वी दिग्दर्शक अनुराग कश्यपने संताप व्यक्त केला. “हे संपूर्ण प्रकरण खूप पुढे गेलं आहे. आता आणखी शांत बसू शकणार नाही. हे सरकार ‘फॅसिस्ट’ आहे. ज्यांचा आवाज खरंच काही बदल घडवू शकतो आणि तेच लोक मौन बाळगत असल्याचा मला जास्त राग येतोय,’ असं अनुरागने त्याच्या ट्विटमध्ये म्हटलं होत.