Anjali Damania slams ‘Dhurandhar: The Revenge’ movie over factual errors: आदित्य धर निर्मित आणि दिग्दर्शित आणि रणवीर सिंह, संजय दत्त यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. मात्र, या चित्रपटातील ऐतिहासिक घटनांच्या क्रमावर समाजसेविका अंजली दमानिया यांनी गंभीर आक्षेप घेतले आहेत. सरकारचे वादग्रस्त निर्णय न्याय्य ठरवण्यासाठी चित्रपटात तथ्यांची मोडतोड करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.
नोटाबंदीचा संदर्भ आणि कालसुसंगतीचा अभाव
‘धुरंधर: द रिव्हेंज’मध्ये एका भारतीय गुप्तहेराचा प्रवास दाखवताना कंदहार विमान हायजॅक, २६/११ चा हल्ला आणि २०१६ मधील नोटाबंदी अशा अनेक घटनांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, अंजली दमानिया यांनी ‘एक्स’ पोस्टद्वारे यातील विसंगती उघड केली आहे. त्या म्हणतात, “चित्रपटात दाखवलेले बहुतांश नायक आणि खलनायक हे २०१४ पूर्वीच, म्हणजेच काँग्रेस सरकारच्या काळात मृत पावले आहेत. मग त्यांचा संबंध २०१६ मध्ये झालेल्या नोटाबंदीशी कसा जोडला जाऊ शकतो?”
दमानिया यांनी मांडलेला मुद्दा
अंजली दमानिया यांनी पुराव्यासह काही पात्रांची माहिती दिली आहे:
हमझा: २००४ मध्ये मृत्यू (काँग्रेस सरकार)
रेहमान डकैत: २००९ मध्ये मृत्यू (काँग्रेस सरकार)
अर्शद पप्पू: २०१३ मध्ये मृत्यू (काँग्रेस सरकार)
एसपी अस्लम खान: २०१४ मध्ये मृत्यू (काँग्रेस सरकार)
दमानिया यांचा सवाल आहे की, “जर हे सर्व लोक नोटाबंदीच्या आधीच मरण पावले होते, तर मग नोटाबंदीने त्यांची कंबर कशी मोडली हे चित्रपटात दाखवण्याचे कारण काय? हा निव्वळ सरकारी निर्णयाचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न आहे.”
“सत्य सत्तेनुसार बदलत नाही”
अंजली दमानिया यांनी आपल्या भूमिकेचे स्पष्टीकरण देताना म्हटले की, त्या पूर्वी काँग्रेसच्या कडव्या टीकाकार होत्या आणि ‘इंडिया अगेंस्ट करप्शन’चा भाग होत्या. पण आज त्या भाजपच्या धोरणांवरही टीका करत आहेत. “सत्य कोण सत्तेत आहे यावर बदलत नाही,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले आहे.
‘धुरंधर’चा हा दुसरा भाग ऐतिहासिक घटनांवर आधारित असल्याचा दावा करत असला, तरी दमानिया यांच्या या आरोपांनंतर सोशल मीडियावर ‘प्रोपोगंडा विरुद्ध वास्तव’ असा नवा वाद पेटला आहे. आता यावर दिग्दर्शक आदित्य धर किंवा चित्रपट निर्माते काय स्पष्टीकरण देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
