लाल निशाण पक्षाचे अध्यक्ष कॉ. भि. र. बावके यांचे निधन

लाल निशाण पक्षाचे (लेनिनवादी) अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार नेते कॉ. भिमाजी रभाजी उर्फ भि. र.बावके (वय ८२) यांचे शनिवारी दिर्घ आजाराने निधन झाले. साकुरी (ता. राहता) येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

लाल निशाण पक्षाचे (लेनिनवादी) अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार नेते कॉ. भिमाजी रभाजी उर्फ भि. र.बावके (वय ८२) यांचे शनिवारी दिर्घ आजाराने निधन झाले. साकुरी (ता. राहता) येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सन १९६० साली कॉ. बावके यांनी कामगार चळवळ सुरू केली. १९६५ मध्ये त्यांनी नगर जिल्हा शेतमजूर युनियनची स्थापना केली. कामगार आंदोलने करताना त्यांना सहा वेळा तुरुंगवास झाला. १९७१ साली टाकळीभान येथे टेलटँकरसाठी त्यांनी पहिले रास्ता रोको आंदोलन केले. के. बी. फार्म, बोरावके फार्म (टाकळीभान) येथे शेतमजुरांचा राज्यातील पहिला संप त्यांनी केला. १९७२ च्या दुष्काळात जनतेचा असंतोष संघटित करून राज्य सरकारला रोजगार हमी योजना राबविण्यासाठी भाग पाडण्यात त्यांचा मोठा सहभाग होता. त्याच वर्षी महात्मा फुले कृषी विद्यापीठात (राहुरी) त्यांनी शेतमजुरांची संघटना स्थापना केली.
शेतमजुरांसोबतच जिल्ह्यातील नगरपालिका, ग्रामपंचायत, वीटभट्टी कामगारांनाही बावके यांनी संघटित केले. वीटभट्टी कामगारांना वेठबिगारीपासून मुक्त करण्याची चळवळ त्यांनी यशस्वीपणे राबविली. कॉ. बावके यांच्या मागे पत्नी आसराबाई, मुलगा राजेंद्र बावके, प्रा. बाळासाहेब बावके, मुलगी जिल्हा परिषदच्या उपकार्यकारी अधिकारी उज्वला बावके-कोळसे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Died of bhimaji bawke