विहिरीतून पाणी आणण्यासाठी गेलेल्या मनीषा श्रीपत घुगे (वय १७) हिचा तोल गेल्याने मृत्यू झाला. ही घटना मंठा तालुक्यातील माळकोंडी येथे घडली. मनीषा घुगे ही पिण्याचे पाणी आणण्यासाठी गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावरील एका शेतातील विहिरीवर गेली होती. विहिरीतून बाहेर काढून तिला मंठा येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
 या वर्षी जिल्ह्य़ात वार्षिक सरासरीच्या जवळपास निम्माच पाऊस झाला असून भूजल पातळी खोलवर गेली आहे. त्यामुळे येत्या दीड महिन्यांत जवळपास १२५ गावे आणि ७० वाडय़ांमध्ये पाणीटंचाई जाणवेल, असा जिल्हा प्रशासनाचा अंदाज आहे. त्याकरिता प्रशासकीय पातळीवर २४५ उपाययोजनांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये अंबड तालुक्यातील ६६ गावे आणि ५० वाडय़ांमध्ये पाणीप्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
विहिरी आणि हातपंपांची पाणीपातळी खोलवर गेली आहे. अनेक जलाशय कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. जिल्ह्य़ातील ७ मध्यम आणि ५७ लघु सिंचन प्रकल्पांमधील सध्याचा जलसाठा १८ टक्के एवढाच आहे. गेल्या वर्षी हाच जलसाठा याच महिन्यात सरासरी ५० टक्के होता. बदनापूर तालुक्यामधील निम्न दूधना प्रकल्प कोरडा असून जाफराबाद तालुक्यातील जीवरेखा प्रकल्पात ३० टक्क्य़ांच्या आत जलसाठा आहे. अंबड तालुक्यातील गल्हाटी प्रकल्पातील साठा ५ टक्क्य़ांच्या आत आहे. ७ मध्यम प्रकल्पांतील साठा सरासरी ३० टक्क्य़ांच्या आत आहे.
मार्डी, रोहिलागड, कानडगाव, धनगरपिंप्री येथील लघुसिंचन प्रकल्प कोरडे पडले आहे, तर जामवाडी, परतवाडी, तळतोंडी, पळसखेडा, चांदई एक्को, राजेवाडी, डावरगाव, तळगेवा, मानेपुरी, बोररांजणी, लासुरा, पानेगाव, भातखेडा, मत्स्येंद्रनाथ चिंचोली, बाणेगाव इत्यादी २२ लघुसिंचन प्रकल्पांतील पाणीपातळी जोत्याच्या खाली गेली आहे.