सावंतवाडी: आखाती भागात सुरू असलेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाचे संकट निर्माण झाले आहे. याचा थेट परिणाम कोकण किनारपट्टीवरील मच्छिमारी व्यवसायावर झाला असून, औद्योगिक डिझेलच्या दरात प्रचंड वाढ झाल्याने मच्छिमार सहकारी संस्था आणि मच्छिमार मोठ्या संकटात सापडले आहेत.

तेल कंपन्यांकडून डिझेलच्या दरात दुसऱ्यांदा मोठी वाढ करण्यात आल्याने मच्छिमारी बंद पडण्याच्या स्थितीत आहे. ​मच्छिमार सहकारी संस्थांना तेल कंपन्यांकडून मिळणाऱ्या डिझेलच्या दरात मोठी तफावत निर्माण झाली आहे. यापूर्वी प्रति लिटर ९५ रुपयांवरून ११५ रुपये अशी वाढ झाल्यानंतर, आता थेट १४४ रुपयांपर्यंत दर वाढविण्यात आले आहेत.

मच्छिमार संस्थांना चुकीच्या पद्धतीने ‘बल्क’ ग्राहकांच्या श्रेणीत समाविष्ट केल्यामुळे ही दरवाढ सोसावी लागत आहे. या दरवाढीमुळे नौका चालवणे आता मच्छिमारांच्या आवाक्याबाहेर गेले आहे.

​मच्छिमारांची कोंडी: परतावा की स्वस्त डिझेल?

​सामान्य पेट्रोल पंपावर सुटे डिझेल कमी दरात उपलब्ध असले, तरी मच्छिमार संस्थांकडून डिझेल घेण्याशिवाय मच्छिमारांकडे पर्याय नाही. शासनाकडून मिळणाऱ्या डिझेल परताव्याच्या रकमेतून मच्छिमार आपल्या कर्जाची परतफेड करत असतात. जर सुटे डिझेल खरेदी केले, तर हा परतावा मिळत नाही आणि संस्थांकडून घेतले तर वाढीव दराचा फटका बसतो, अशा दुहेरी कात्रीत मच्छिमार अडकला आहे.

​हॉटेल व्यवसाय ठप्प, मासळीची मागणी घटली:

​इंधन संकट केवळ डिझेलपुरते मर्यादित राहिलेले नाही. कमर्शिअल गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने अनेक हॉटेल व्यावसायिकांनी आपली हॉटेल्स बंद ठेवली आहेत किंवा खाद्यपदार्थांवर निर्बंध आणले आहेत. हॉटेलमधून मासळीची खरेदी थांबल्याने मच्छिमारांना बाजारात योग्य दर मिळेनासा झाला आहे.

​”डिझेल दरवाढीमुळे मच्छिमारी व्यवसाय पूर्णपणे कोलमडण्याच्या मार्गावर आहे. सरकारने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन मच्छिमारांना दिलासा द्यावा. खासदार नारायण राणे, पालकमंत्री तथा मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांनी या विषयात पुढाकार घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा.”

अशी मागणी विकी चोपडेकर (अध्यक्ष, मालवण मच्छिमार सोसायटी), संतोष खंदारे (संचालक, राजकोट मच्छिमार सोसायटी) व जगदीश खराडे (अध्यक्ष, श्री रामेश्वर मच्छिमार सोसायटी, दांडी) यांनी केली आहे. ​या गंभीर परिस्थितीची सरकारने दखल न घेतल्यास सिंधुदुर्गातील हजारो मच्छिमार कुटुंबांवर उपासमारीची वेळ येईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.