जिल्हाध्यक्ष बाबाजानी यांच्या राजीनाम्यानंतर ‘राष्ट्रवादी’तील धुसफुस चव्हाटय़ावर

आसाराम लोमटे

परभणी : आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षातला अंतर्गत कलह समोर आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये बेबनाव असल्याचे वारंवार दिसून येत होते, बाबाजानी यांच्या राजीनाम्याने तो चव्हाटय़ावर आला आहे.

जिल्ह्यात काही महिन्यांपासून राष्ट्रवादीत पडद्याआड घडणाऱ्या अनेक घटना घडामोडी पाहू जाता राष्ट्रवादीत सारेच आलबेल नसल्याचे दिसत होते. गेल्या अनेक महिन्यांपासून अंतर्गत धुसफुस सुरू आहे. परभणी जिल्ह्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद मोठी आहे आणि जिल्ह्यातील नेत्यांची संख्याही उदंड आहे. आठ महिन्यांपूर्वी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका पार पडल्या. संचालकपदाच्या निवडीनंतर अध्यक्षपदाची मोर्चेबांधणी सुरू झाली. आमदार सुरेश वरपुडकर विरुद्ध माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर अशी रस्सीखेच अध्यक्षपदासाठी पाहायला मिळाली. वरपूडकर यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मोट बांधली तर बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपची रणनीती आखली गेली. त्यावेळी बाबाजानी यांनी बोर्डीकर यांच्याशी संधान बांधले. राष्ट्रवादीच्या संचालकांनी महाविकास आघाडी सोबत जावे असा पक्षादेश असताना बाबाजानी यांनी या आदेशाला छेद देणारी भूमिका घेतली. संचालक असलेल्या राजेश विटेकर यांनी महाविकास आघाडी सोबत जाणे पसंत केले. या घटनेपासून बाबाजानी विरुद्ध विटेकर हा अंतर्गत संघर्ष राष्ट्रवादीत सुरू झाला. तोवर बाबाजानी यांच्या प्रभावाखाली असलेल्या विटेकर यांनी हळूहळू पक्षात आपली स्वतंत्र वाट चोखाळायला प्रारंभ केला. विटेकर यांनीच सोनपेठचे माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड यांना राष्ट्रवादीत आणले.  बाबाजानी यांना त्याची पुसटशीही कल्पना नव्हती. पालकमंत्र्यांसह अन्य नेत्यांशी राठोड यांच्या भेटीगाठी विटेकर यांनी घडवून आणल्या. याबाबतही बाबाजानी अनभिज्ञ होते.

त्याच वेळी सोनपेठ येथील जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या एका इमारतीसंदर्भात खासदार संजय जाधव यांनी तक्रार दिली. खासदार जाधव हे विटेकर यांचे राजकीय विरोधक असल्याने ते आश्चर्यकारक वाटले नाही. पण बाबाजानी यांनीही याच प्रकरणात तक्रार दिली. जिल्हा परिषद राष्ट्रवादीच्या ताब्यात असताना बाबाजानी यांनी ही तक्रार दिलीच कशी याबाबत मात्र आश्चर्य व्यक्त झाले होते. त्यानंतर या दोघांचे मतभेद आणखीणच वाढले.

माजी आमदार विजय भांबळे यांच्याशीही बाबाजानी यांचे मतभेद त्याआधी झाले होते. सुरुवातीला बाबाजानी यांनी पालकमंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात थेट भूमिका घेतली होती. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा बाबाजानी यांना पाठिंबा होता पण एक- एक स्थानिक नेता त्यांच्या विरोधात जात असल्याचे दिसून येत होते. परभणी महापालिकेतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा एक मोठा गट त्यांच्या विरोधात गेला होता. परभणी महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शहर जिल्हाध्यक्षपदी प्रताप देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या नियुक्तीत थेट लक्ष घातले ही बाब हा बाबाजानी यांना मोठा धक्का होता.

बाबाजानी हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर यांच्याशी जुळवून घेत आहेत, मग जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्ष वाढणार कसा अशा तक्रारी स्थानिक नेत्यांनी नेतृत्वाच्या कानावर घातल्या. एकीकडे हे सगळे होत असताना बाबाजानी आणि पक्ष नेतृत्वात मोठे अंतर पडत गेले. त्याचवेळी राजेश विटेकर यांना बळ दिले जात असल्याचे स्पष्टपणे दिसू लागले होते. बाबाजानी यांनी आठ-दहा दिवसांपूर्वी पक्षाकडे आपला राजीनामा दिला होता. पण याबाबत कोणालाही कल्पना नव्हती. त्यानंतर पक्षाचे मराठवाडा संघटक जयसिंगराव गायकवाड हे एका बैठकीच्या निमित्ताने परभणीला घेऊन गेले. त्यावेळी बाबाजानी गैरहजर होते. आपल्या राजीनाम्याची दखल पक्ष घेईल याची काही दिवस त्यांनी वाटही पाहिली मात्र कोणताही प्रतिसाद न आल्याने त्यांच्या गोटातून हा राजीनामा उघड झाला.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी मंगळवारी (दि. ३०) बाबाजानी यांची मुंबईत चर्चा होणार आहे. या चर्चेनंतर पुढील दिशा स्पष्ट होईल, असे त्यांच्या समर्थकांनी सांगितले.

जिल्ह्यात स्थापनेपासून आपण राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आहोत. असंख्य कार्यकर्त्यांना आपण बळ दिले. राजेश विटेकर यांना दोन वेळा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष करण्यात आपली भूमिका मोठी होती. लोकसभा निवडणुकीतही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा होतो. उलट राष्ट्रवादीतलेच काही नेते लोकसभेला विटेकर यांच्या विरोधात गेले होते. सहकारात पक्षीय राजकारण नसते, त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत जी भूमिका घेतली ती पक्षाच्या विरोधात होती असे म्हणता येणार नाही. जिल्ह्यात भाजप, काँग्रेस, शिवसेनेला वारंवार अंगावर घेऊन पक्ष वाढवला. असे असताना पक्षातीलच राजेश विटेकर, विजय भांबळे नेत्यांचे कान भरत असतील आणि नेतेही त्यांचे ऐकून घेत असतील तर मग कोणासाठी काम करायचे? पक्षात आपली कोंडी होत असल्याचे जाणवले. त्यातून जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. 

बाबाजानी दुर्रानी,  विधान परिषद सदस्य