नगर अर्बन बँकेत आम्ही काम करताना काही चो-या केल्या नाहीत की दरोडे टाकलेले नाहीत, केवळ तांत्रिक मुद्यांचा आधार घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पोलिसांनी पाहिजे तर मला प्रथम अटक करावी, असे प्रतिपादन बँकेचे अध्यक्ष खासदार दिलीप गांधी यांनी केले.
लेखापरीक्षकांच्या तक्रारीवरून काही दिवसांपूर्वी कोतवाली पोलिसांनी खा. गांधी यांच्यासह ५२ आजीमाजी संचालक तसेच अधिकारी यांच्याविरुद्ध १ कोटी ७३ लाख रुपयांचा गैरव्यवहार, अपहार व फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात काही जणांनी अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या दाखल झालेल्या गुन्हय़ासंदर्भात प्रथमच गांधी यांनी मत प्रदर्शित केले. अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने बोलावलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी वरील मत व्यक्त केले.
‘मटकेवाल्याला’ पुढे करून हा गुन्हा दाखल केल्याचा आरोप गांधी यांनी केला. केंद्र सरकार, राज्य सरकार, सहकार खाते या सर्वानी ‘क्लीन चिट’ देऊनही केवळ तांत्रिक मुद्याच्या आधारावर गुन्हा दाखल केला गेला. आम्ही काहीही चुकीचे केले नाही, बँकेत काही चो-या केल्या नाहीत की दरोडे टाकलेले नाहीत, आमच्यामुळे बँकेला काहीही तोषीस लागणार नाही, याची काळजी आम्ही घेतली आहे, व्यक्तिगत स्वार्थातून काही जण बँकेला वेठीला धरत आहेत, असा आरोप त्यांनी केला. या वेळी बँकेचे संचालक राधावल्लभ कासट, नवनीत सूरपुरिया, अशोक कटारिया, मनेष साठे, भाजपचे अनिल गट्टाणी, बाळासाहेब पोटघन आदी या वेळी उपस्थित होते.