अहिल्यानगर : निवृत्त सनदी अधिकारी दिलीप कोंडिबा खेडकर व त्यांची पत्नी मनोरमा खेडकर (दोघे रा. भालगाव, पाथर्डी, अहिल्यानगर) या दोघांविरुद्ध ज्ञात उत्पन्नापेक्षा १०२ टक्के अधिक म्हणजे १३ कोटी ३० लाख ९१ हजार ६९६ रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळून आल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज, मंगळवारी रात्री पाथर्डी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे येथील पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांनी गुन्हा दाखल झाल्याची माहिती दिली.
दिलीप खेडकर व मनोरमा खेडकर हे दोघे वादग्रस्त भारतीय प्रशासन सेवेतील माजी प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर हिचे आई-वडील आहेत. पूजा खेडकर यांच्या अपंगत्वाच्या प्रमाणपत्रावरून वाद निर्माण झाले होते. दिलीप खेडकर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निवृत्त प्रादेशिक अधिकारी आहेत; तसेच त्यांनी नगर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून लढवली होती.
खेडकर यांच्या संपत्तीची चौकशी करावी, अशी तक्रार अहिल्यानगरमधील पंढरीनाथ शंकर साबळे यांनी सन २०१२ मध्ये केली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खेडकर यांच्या मालमत्तेची उघड चौकशी केली. सन १९९५ ते २०२३ या कालावधीसाठी ही तपासणी करण्यात आली. खेडकर हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात १९८९ पासून सेवेत होते. ते मे २०२३ मध्ये निवृत्त झाले. खेडकर कुटुंबाचे एकूण ज्ञात उत्पन्न १३ कोटी २ लाख ७८ हजार ७७५ रुपये, तर एकूण खर्च १५ कोटी ३३ लाख ७४ हजार ८५५ असल्याचे आढळले. तसेच त्यांच्या ज्ञात मालमत्तेचे मूल्य १० कोटी ९९ लाख ८५ हजार ६१६ रुपये असल्याचे आढळले.
ज्ञात स्रोतांच्या तुलनेत मालमत्ता व खर्चाची रक्कम १३ कोटी ३० लाख ८१ हजार ६९६ म्हणजे ज्ञात उत्पन्नाच्या १०२ टक्के (दुप्पट) अधिक असल्याचे आढळले. खेडकर यांच्या नावावर अहिल्यानगर, पुणे, हवेली, पवई, बारामती, भालगाव, मुळशी, औंध, पनवेल, खरवंडी कासार, शिरूर कासार येथे स्थावर मालमत्ता असल्याचे विभागाला आढळले. या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक सविता तांबे यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
