Dilip Sopal refusal post Shivsena Big split in Shiv Sena Uddhav Thackeray Reconstruction solapur news ysh 95 | Loksatta

सोलापूर: शिवसेनेत पद घेण्यास दिलीप सोपल यांचा नकार

सोलापूर जिल्ह्यात माढा लोकसभा मतदारसंघात संघटकपदाची दिलेली जबाबदारी स्वीकारण्यास माजी मंत्री दिलीप सोपल यांनी नकार दिला आहे.

सोलापूर: शिवसेनेत पद घेण्यास दिलीप सोपल यांचा नकार
उध्दव ठाकरेंकडून शिवसेनेत पद घेण्यास दिलीप सोपल यांचा नकार

सोलापूर: राज्यात शिवसेनेत मोठी फूट पडून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर अडचणीत आलेल्या उध्दव ठाकरे शिवसेनेची पुनर्बांधणी होण्यासाठी नव्या नेमणुका करत आहेत. मात्र सोलापूर जिल्ह्यात माढा लोकसभा मतदारसंघात संघटकपदाची दिलेली जबाबदारी स्वीकारण्यास माजी मंत्री दिलीप सोपल यांनी नकार दिला आहे. त्यामुळे उध्दव ठाकरे शिवसेनेला धक्का बसला आहे.

सोलापूर जिल्ह्यात सोलापूर आणि माढा या दोन्ही लोकसभा मतदारसंघांसाठी उध्वस्त ठाकरे शिवसेनेने स्थानिक अनुभवी नेत्यांवर जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत. यात सोलापूर लोकसभा मतदार संघासाठी माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे तर साईनाथ अभंगराव यांना माढा लोकसभा मतदारसंघाच्या सहसंपर्क प्रमुखपदी नियुक्त करण्यात आले आहे. अजय दासरी आणि माजी मंत्री दिलीप सोपल यांच्यावर अनुक्रमे सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाच्या संघटकपदी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच मोहोळ येथील दीपक गायकवाड यांची सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या समन्वयकपदावर नियुक्ती झाली आहे.

तथापि, या नेमणुका जाहीर झाल्यानंतर बार्शीचे माजी मंत्री दिलीप सोपल यांनी आपणांस दिलेली जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला आहे. राजकारणापेक्षा समाजकारणात काम करीत असल्यामुळे आपण माढा लोकसभा मतदारसंघाच्या संघटकपदाची जबाबदारी घेऊ इच्छित नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे दिलीप सोपल २०१९ साली विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राजकीय वारे पाहून राष्ट्रवादीतून बाहेर पडत उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांनी शिवसेनेच्या तत्कालीन धनुष्यबाण चिन्हावर बार्शी विधानसभा निवडणूक लढविली होती. त्यात त्यांना भाजप पुरस्कृत राजेंद्र राऊत यांच्याकडून धक्कादायक पराभव पत्करावाला लागला होता. सोपल यांचे शिवसेनेची वाट चुकल्याचे मानले जात असताना ते स्वतः शिवसेनेच्या संघटनात्मक पातळीवर फारसे सक्रिय दिसत नाहीत. उलट, राष्ट्रवादीच्या नेत्यांशी त्यांची मैत्री सुरूच आहे. अलिकडे राष्ट्रवादीचे युवा नेते आमदार रोहीत पवार यांनी बार्शीत दिलीप सोपल यांची घेतलेली भेट चर्चेचा विषय ठरला होता. यातच आता उध्दव ठाकरे शिवसेनेत मिळालेले माढा लोकसभा मतदारसंघाचे संघटकपद सोपल यांनी स्वीकारण्यास स्पष्ट नकारा दिल्यामुळे उध्दव ठाकरे शिवसेनेला धक्का बसला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-12-2022 at 18:50 IST
Next Story
“मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कधीच विरोधी पक्षांना विश्वासात घेत नाहीत” ; सुप्रिया सुळेंचा आरोप!