शिर्डीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (६ एप्रिल) शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, शिर्डी पोलीस ठाणे व शिर्डी येथील पोलीस अंमलदारांच्या ११२ निवासस्थानांच्या नूतन इमारतींचे उद्घाटन केले. यावेळी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सरकार पोलीस दलाच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याचं सांगितलं. तसेच सरकार सर्व मदत करायला तयार आहे, पण पोलीस दलाने देखील सरकारची प्रतिमा उंचावण्यासाठी काम केले पाहिजे, असं मत व्यक्त केलं.

दिलीप वळसे म्हणाले, “आपल्या जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कशी अबाधित राहील, अवैध धंदे कसे बंद होतील आणि पोलिस ठाण्याचा कारभार कसा पारदर्शक होईल आणि सामान्य माणसाला न्याय कसा मिळेल, याकडे पोलिसांनी अधिकाधिक लक्ष द्यावे. सरकार पोलिस दलाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.”

“…पण पोलिसांनी देखील सरकारची प्रतिमा उंचावण्यासाठी काम केले पाहिजे”

“तुम्हाला सर्व प्रकारची मदत करण्यासाठी आम्ही तयार आहोत. पण पोलिसांनी देखील सरकारचे प्रतिनिधी म्हणून तळागाळात सरकारची प्रतिमा उंचावण्यासाठी पारदर्शक पद्धतीने काम केले पाहिजे,” असे आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.

“पोलिसांना पुढील दोन महिन्यांत ६८५३ घरे उपलब्ध करून देणार”

दिलीप वळसे-पाटील म्हणाले, “राज्यातील पोलिसांना सुसज्ज घरे मिळाल्यास त्यांच्या कार्यक्षमतेत निश्चित वाढ होणार आहे. राज्यातील पोलिसांना पुढील दोन महिन्यांत ६८५३ घरे उपलब्ध करून देण्यात येतील. शासनाने एसआरपीएफमधील पोलिसांना राज्य पोलिसात घेण्याचा निर्णय घेतला. पोलीस शिपायास निवृत्तीपर्यंत पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला.”

“धार्मिक तेढ व अशांतता निर्माण होणार नाही यासाठी काम करा”

“कोरोना काळात पोलिसांनी रस्त्यावर येऊन २४ तास काम केले. गृह विभाग पोलिसांना घरे व विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पोलीस दलाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे‌. राज्यात धार्मिक तेढ व अशांतता निर्माण होणार नाही, यासाठी काम करावे,” असेही गृहमंत्री वळसे-पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा : “मी आज राज्याच्या गृहमंत्र्यांना शब्द देतो की…”, शिर्डीत अजित पवार यांची मोठी घोषणा

या इमारतीचे बांधकाम महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित, मुंबई यांनी केले आहे. यावेळी अजित पवार यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात २ महिला पोलीस व १ पुरूष पोलीस अंमलदारास फ्लॅटच्या चाव्या हस्तांतरित करण्यात आल्या. कार्यक्रमाचे संयोजन अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, कार्यकारी अभियंता सुनिल‌ सांबे, उप विभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, हिरालाल पाटील यांनी केले.