जगण्या-मरण्याचे जे तत्त्वज्ञान नटसम्राट बालगंधर्व यांनी सांगितले होते त्या तत्त्वज्ञानाची अनुभूती प्रा. दिनकर वानखेडे यांच्या ‘खडकावरच्या वाटा’ या काव्यसंग्रहात दिसून येते. जगण्याला जशी ईश्वराची मर्जी पाहिजे तशी मरण्यालाही ईश्वराची मर्जी पाहिजे, असे बालगंधर्वानी त्यांच्या जीवनाच्या उत्तरार्धात नाशिक येथे झालेल्या सत्काराच्या वेळी सांगितले होते. जगण्या-मरण्याचे हे तत्त्वज्ञान प्रा. वानखेडे यांनी अद्भूत शब्दात व्यक्त केले आहे. जीवनाचा प्रवास म्हणजे जेथे जेथे जे जे चांगले आहे ते ते घ्यावे आणि नकोसे सोडून द्यावे, असा असतो, हा प्रा. वानखेडेंचा जीवनविषयक दृष्टीकोन प्रत्येकाला नवी दृष्टी देणारा आहे, असे उद्गार माजी आमदार प्रा. बी.टी. देशमुख यांनी येथे काढले.

मरणालाही मरण येईल इतकेही जगू नये. माणसाने जगण्याचे भोग जरूर भोगावे, पण जाताना सख्या-सोबत्यांचे डोळे कोरडे राहतील, असेही मरू नये. माणसाने या प्रा. वानखेडेंच्या कवितेने ‘जगण्या-मरण्याचे तत्त्वज्ञान’ किती सोप्या शब्दात सांगितले. त्यांच्या काव्यात शिक्षण, विदर्भाचा अनुशेष आणि शेतकऱ्यांचे प्रश्न, संघटनांचे सामाथ्र्य आणि थोडय़ा प्रमाणात शृंगारही व्यक्त झाला आहे, असे सांगून बी.टीं.नी रसिकश्रोत्यांना खिळवून ठेवले.
डॉ.वि.भि. कोलते संशोधन केंद्र व वाचनालय आणि येथील विदर्भ साहित्य संघ शाखेच्या वतीने प्रा.दिनकर वानखेडे यांच्या ‘खडकावरच्या वाटा’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन मंगळवारी संशोधन केंद्राच्या परिसरात प्रा. बी.टी. देशमुख यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी हृदयरोगतज्ज्ञ डॉ.भालचंद्र वाघ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या भावपूर्ण प्रकाशन सोहळ्याला वऱ्हाडी कवी शंकर बडे, अमरावतीचे माजी महापौर
मिलिंद चिमाटे आणि ‘नुटा’चे अध्यक्ष
प्रा. डॉ.प्रवीण रघुवंशी, एम.डी.दाते, डॉ. रमाकांत कोलते इत्यादी व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचलन शिल्पा वानखेडे, प्रास्ताविक डॉ. रमाकांत कोलते, कवीचा परिचय प्रा. घनश्याम दरणे यांनी, तर आभार रूपाली वानखेडे यांनी मानले. दिनकर वानखेडे यांच्या काही हृदयस्पर्शी व काही शृंगारिक कवितांवर बी.टी. देशमुखांनी केलेल्या अप्रतिम भाष्याने श्रोते काही काळ स्वत:ला काव्याच्या प्रदेशात हरवून बसले होते.

बी.टीं.च्या नव्या पलूने श्रोते मंत्रमुग्ध
राज्यशास्त्राचे प्राध्यापक, ‘नुटा’चे माजी अध्यक्ष, विदर्भाच्या अनुशेषाचे प्रगाढ अभ्यासक व ३० वष्रे विधान परिषद गाजवणारे, तसेच उत्कृष्ट संसदपटू असलेल्या प्रा.बी.टी. देशमुख यांच्या हृदयाच्या कप्प्यात दडलेल्या एका कवीच्या अंत:करणाचा परिचय त्यांच्या भाषणाने प्रथमच श्रोत्यांना आला. आपल्या भाषणात बालगंधर्व, कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर, कुसुमाग्रज, कवी ‘बी’, ‘रेव्हरंड’ नारायण वामन टिळक इत्यादी अनेक महान साहित्यिकांच्या प्रतिभेचा आणि साहित्याचा परिचय देत बी.टीं.नी या काव्यसंग्रहाचे केलेले रसग्रहण यवतमाळकरांसाठी साहित्याची मेजवानी ठरली. रेव्हरंट टिळकांच्या ‘केवढे हे क्रौर्य’ या कवितेतील कडवेच्या कडवे सादर करून बी.टी.म्हणाले की, त्या पक्षिणीला मारलेला बाण आणि आता शेतकऱ्यांच्या हृदयात विद्यमान व्यवस्थेने केलेल्या जखमा सारख्याच आहेत. वानखेडेंच्या कवितेत ‘रेव्हरंड’ टिळकांसारखे व्यथा व्यक्त करण्याचे सामथ्र्य आहे.