scorecardresearch

‘जरंडेश्वर’ कारखान्याचा दोन दिवसा नंतर ईडीकडून प्रत्यक्ष ताबा: डॉ.शालिनीताई पाटील

जरंडेश्वर’चा गळीत हंगाम संपला असून दोन दिवसा नंतर ईडीकडून कारखान्याचा प्रत्यक्ष ताबा घेतला जाईल.

जरंडेश्वर’चा गळीत हंगाम संपला असून दोन दिवसा नंतर ईडीकडून कारखान्याचा प्रत्यक्ष ताबा घेतला जाईल.आता हा कारखाना सभासदांच्या ताब्यात मिळावा, या मागणीसाठी आवश्यक तेवढ्या सभासदांच्या सह्यांचे निवेदन प्रतिज्ञापत्रासह ईडीच्या न्यायालयात दिले जाणार असल्याची माहिती ‘जरंडेश्वर’च्या संस्थापिका माजी मंत्री डॉ. शालिनीताई पाटील यांनी आज कोरेगाव येथे पत्रकार परिषदेत दिली.
जरंडेश्वर’चा विषय ईडीच्या न्यायालयाच्या अखत्यारीतील असल्याने याप्रश्नी कोणालाही सर्वोच्च न्यायालयात जाता येणार नाही असा दावा श्रीमती पाटील यांनी केला.जरंडेश्वर’चा गळीत हंगाम संपला असून, प्रोसेसमधील साखर काढण्यासाठी दोन दिवस जातील. त्यानंतर ईडीकडून कारखान्याचा प्रत्यक्ष ताबा घेतला जाईल.
मागील दोन जुलै रोजी न्यायालयाच्या आदेशाने ईडीने कागदपत्री कारखाना ताब्यात घेतला. परंतु कारखान्याच्या कामकाजात बाधा आली नाही. तत्पूर्वी दोन वेळा ईडी व इन्कम टॅक्सचा छापा कारखान्यावर पडला. त्यातून एक हजार ४०० कोटींचा गैरव्यवहार बाहेर आला. दरम्यानच्या काळात किरीट सोमय्या यांच्या माध्यमातून आमचे संचालक मंडळ ईडी कार्यालयाच्या संपर्कात होते. गेल्या दहा दिवसांपासून कोरेगाव, खटाव तालुक्यातील सभासदांच्या सह्या घेण्याचे काम कार्यकर्त्यांनी केले आहे. आमदार महेश शिंदे यांचेही सहकार्य आहे. आता हा कारखाना सभासदांच्या ताब्यात मिळावा, या मागणीसाठी आवश्यक तेवढ्या सभासदांच्या सह्यांचे निवेदन प्रतिज्ञापत्रासह ईडीच्या न्यायालयात दिले जाणार आहे. आमच्या विरोधातील जिल्ह्यातील चोंबडे लोक जरंडेश्वरप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगत आहेत; परंतु हा ईडीच्या न्यायालयातील विषय असल्याने याप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात जाता येणार नाही. कारखान्याचे यापुढील काम राज्य शासनाशी संबंधित नाही, तर ते केंद्र शासनाशी निगडित आहे. जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची आठ कोटी ३४ लाखांची धनलक्ष्मी ठेव शिखर बँकेमध्ये असून, या ठेवीची मुदत वाढवण्यासाठी आमच्या कारखान्याच्या एमडींकडे शिखर बँकेने केलेला पत्रव्यवहार आमच्याकडे आहे, असे नमूद करुन श्रीमती पाटील म्हणाल्या
कारखान्यासंदर्भातील माझे मुंबईतील काम संपल्याने यापुढे माझे कायमस्वरुपी वास्तव्य कोरेगाव तालुक्यातच राहणार आहे. कारखाना ताब्यात मिळाल्यावर तेथील बंगल्यावर जाता येईल.जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांची विशेष सभा कोरेगाव येथे येत्या २५ तारखेला दुपारी चार वाजता होणार असल्याचे श्रीमती पाटील यांनी सांगितले.
यावेळी संचालक पोपटराव शेलार, हणमंतराव भोसले, आनंदराव गायकवाड, अक्षय बर्गे, धनंजय कदम, संतोष कदम, किसनराव घाडगे उपस्थित होते.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा नामोल्लेख टाळून पाटील म्हणाल्या, बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतरचा वाघ खरोखरच कागदाचा वाघ आहे. घडी घडी आजारी पडतात, त्यांनी मुख्यमंत्रीपदावर राहण्याचा सोस कशाला करावा? त्यांच्या पक्षातील योग्य व्यक्तीला मुख्यमंत्रीपद द्यावे. विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत महेश शिंदे यांना शिवसेनेचे उमेदवार म्हणून नव्हे, तर नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आम्ही पत्र दिले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Direct possession jarandeshwar factory dr shalinitai patil koregaon press conference supreme court amy

ताज्या बातम्या