प्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचं निधन

पुण्यात घेतला अखेरचा श्वास

प्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचं आज पुण्यात निधन झालं. त्या बऱ्याच काळापासून आजारी होत्या. त्यांनी पुण्यातल्या सह्याद्री रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्या ७८ वर्षांच्या होत्या.

सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या जोडीने अनेक प्रतिभावान चित्रपट बनवले. ज्यांना देशविदेशात पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. सुमित्रा यांनी अनेक चित्रपट, मालिका आणि लघुपटांचं लिखाणही केलं आहे. झोपडपट्टीतल्या महिलांचं आयुष्य दाखवणारा, १९८५ सालचा बाई हा सुमित्रा यांचा पहिला लघुपट हा त्यांच्या स्त्रीवाणी या शोधप्रकल्पाचा भाग होता. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. त्यांचा पुढचा लघुपट पाणी यालाही राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

त्यानंतर त्यांनी मुक्ती, चाकोरी, लहा, थ्री फेसेस ऑफ टुमारो असे लघुपट बनवले. सुमित्रा यांना त्यांच्या योगदानाबद्दल चित्र रत्न पुरस्कार आणि कामधेनू पुरस्कारही मिळाला.

सुमित्रा भावे यांनी सुनील सुकथनकर यांच्या सोबत दोघी हा चित्रपट बनवला. समाजाच्या चक्रात अडकलेल्या दोन बहिणींची ही कथा आहे. या चित्रपटाला समीक्षकांकडून नावाजलं गेलं. या चित्रपटाला महाराष्ट्र सरकारचा चित्रपट पुरस्कारही मिळाला. तसंच सामाजिक विषयावरच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. त्यांच्या इतरही अनेक चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

‘दोघी’, ‘जिंदगी जिंदाबाद’, ‘दहावी फ’, ‘वास्तुपुरुष’, ‘देवराई’, ‘नितळ’, ‘एक कप च्या’, ‘घो मला असला हवा’, ‘संहिता’, ‘अस्तू’, ‘कासव’ हे त्यांची काही प्रमुख चित्रपट. या चित्रपटांचं लेखन आणि दिग्दर्शनही त्यांनी केलं आहे.

सुमित्रा या दीर्घकाळापासून कॅन्सर या आजाराशी लढा देत होत्या. आज सकाळी पुण्यातल्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Director sumitra bhave dies in pune vsk