अहिल्यानगर: घरात एकट्या असलेल्या ४० वर्षीय अपंग विवाहित महिलेचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना शहराच्या बोल्हेगाव उपनगरात घडली. भर दिवसा, भरदुपारी घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. तोफखाना पोलिसांनी या संदर्भात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक जगदीश भांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार चोरीच्या उद्देशाने करण्यात आलेला नाही, असे प्रथमदर्शनी दिसते. त्यामुळे इतर कारणांचा शोध घेतला जात आहे. घटनास्थळी एक चाकू व ब्लेडपान आढळले आहे. मृत महिलेच्या गळ्यावर व हनुवटीवर वार करण्यात आलेले आहेत.

बोल्हेगाव उपनगरात महिला, पती व मुलासह एका रो- हाउसिंगमध्ये राहते. पतीचे एमआयडीसीमध्ये वर्कशॉप असून वडील व मुलगा दोघे वर्कशॉपचे काम पाहतात. काल, शुक्रवारी सकाळी महिलेचा पती व मुलगा नाशिक जिल्ह्यात येवला तालुक्यात साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी गेले होते. पत्नी घरी एकटीच होती. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पतीने पत्नीला वारंवार फोन केला मात्र प्रतिसाद मिळाला नाही. कोपरगाव तालुक्यातून सासऱ्यांनीही फोन केला, परंतु त्यांनाही प्रतिसाद मिळाला नाही.

त्यामुळे पती व मुलाने शेजारी राहणाऱ्यांना फोन करून चौकशी करण्यास सांगितले. घराच्या दरवाजाला बाहेरून कडी लावण्यात आलेली होती. ही कडी उघडून शेजारी राहाणाऱ्यांनी आत पाहिले असता, महिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली. शेजाऱ्यांनी पोलिसांना व पतीला माहिती दिली. महिलेचा पती व मुलगा घरी परतण्यास सायंकाळ झाली. पती व मुलाने घरात पाहणी केली असता फरशीवर रक्ताचे थारोळे तसेच एक चाकू व ब्लेडपान पडलेले आढळले. महिलेला सरकारी रुग्णालयात नेण्यात आले मात्र तेथील डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

महिलेच्या हनुवटी व गळ्यावर धारदार शस्त्राने कापलेल्या मोठ्या जखमा होत्या, त्यातून मोठा रक्तस्त्राव झाला होता, पतीने दिलेल्या फिर्यादीनुसार तोफखाना पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ यांनी दिलेल्या माहितीनुसार महिला घरात एकटी असली तरी खून चोरीच्या कारणासाठी झालेला नाही. घरात कुठे उचकपाचक झालेली नाही. त्यामुळे खुनामागील इतर कारणांचा शोध घेतला जात आहे. अपंग महिला घरात एकटीच होती. ती एका रो-हाऊसिंगमध्ये राहत होती, मात्र खून झालेले शेजाऱ्यांनाही कळाले नाही. अधिक तपास तोफखाना पोलीस करत आहेत. अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही.