|| नीलेश पवार
नंदुरबारमध्ये सरासरीच्या ३४ टक्केच पाऊस

नंदुरबार : राज्यात सर्वात कमी पर्जन्यमान असल्याने नंदुरबार जिल्हा हा दुष्काळाच्या छायेत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या केवळ ३४ टक्के इतकाच पाऊस झाल्याने आता पिण्याच्या पाण्याबरोबर पिकेही संकटात आली आहेत. असे असताना राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीत दुष्काळ घोषणेवरून मतभिन्नता दिसत आहे. शिवसेना नंदुरबारला दुष्काळी घोषित करण्याबाबत आक्रमक आणि आग्रही असताना दुसरीकडे काँग्रेस मात्र ‘थांबा आणि वाट बघा’ या भूमिकेत असल्याने विरोधकांना आयते कोलीत मिळणार आहे.

राज्यात काही भागात महापुराची परिस्थिती असताना उत्तर महाराष्ट्राकडे मात्र यंदा वरुण राजाने पाठ फिरवली आहे. जूनपासून आतापर्यंतच्या सरासरीच्या केवळ २४ टक्के म्हणजे २०१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असल्याने सर्वांच्याच तोंडचे पाणी पळाले आहे. जिल्ह्यात एकूण दोन लाख ८३ हजार ४८० हेक्टर लागवड क्षेत्रापैकी जवळपास दोन लाख ५९ हजार ६७४ हेक्टर क्षेत्रावरील पेरणी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात भात, बाजरी, मका, तूर, मूग, कापूस सोयाबीन, ऊस अशा सर्वच प्रमुख पिकांसह एकूण क्षेत्राच्या जवळपास ९२ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र आता वरुण राजाने जिल्ह्याकडे पाठ फिरवल्याने शेतकरी चांगलाच हवालदिल झाला आहे. काही ठिकाणी दुबार पेरण्यांचे संकट उभे ठाकले असून पिकाला जिवंत ठेवण्यासाठी बादलीतून लोट्याद्वारे पाणी देण्याचे काम करत शेतकरी आभाळाकडे आस लावून बसला आहे. ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्याचा विचार केला तर मागच्या वर्षाच्या सरासरीच्या जिल्ह्यात फक्त १० टक्के पाऊस झाल्याने अनेक महसुली मंडळात दुष्काळजन्य परिस्थिती उभी ठाकणार आहे.

मुळात जिल्हा दुष्काळी घोषित करण्याची मागणी पहिल्यांदा शिवसेनेने केल्याने आणि श्रेयवाद मिळण्याच्या भीतीने आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांनी या मागणीला केराची टोपली दाखवल्याचा आरोप चंद्रकांत रघुवंशी यांनी केला आहे. मात्र याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची  भेट घेऊन दुष्काळाच्या भयावह परिस्थितीबाबत सर्व बाबी निदर्शनास आणून दिल्या जातील, असे शिवसेनेकडून सांगण्यात आले. पाणीटंचाईबाबत गंभीर स्थिती होत आहे. नंदुरबार नगरपालिकाही दोन दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन करीत असताना  लोकप्रतिनिधी जिल्हा दुष्काळी घोषित करण्याबाबत का आग्रही नाहीत, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. राज्यातील सत्ताधारी आघाडी सरकारच्या दोन पक्षांमध्ये मत मतांतरे दिसून येत असली तरी या संवेदनशील प्रश्नाबाबत लोकप्रतिनिधींनी अधिक सजग होऊन तत्काळ पावले उचलण्याची गरजही व्यक्त होत आहे.

भाजपकडून मागणी…राज्यात ही परिस्थिती सर्वाधिक चिंता वाढवणारी असल्याने विरोधक भाजपचे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नंदुरबार दौऱ्यावर असतानाच जिल्ह्यात दुष्काळ घोषित करण्याची मागणी के ली होती. मात्र त्यास महिना उलटत आल्याने आणि पावसाची प्रतीक्षा अद्यापही कायम असल्याने १४ ऑगस्ट रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत समितीने  जिल्ह्यात दुष्काळ  घोषित करण्याचा ठराव करून राज्य शासनाला त्वरित पाठवण्याची मागणी शिवसेना नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केली होती. परंतु, काँग्रेसचे पालकमंत्री असलेल्या के . सी. पाडवी यांनी त्याकडे दुर्लक्ष करत आणखी काही दिवस याबाबत वाट पाहून मंत्रिमंडळात प्रस्ताव मांडण्याची भूमिका ठेवल्याने जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यावरून सत्ताधाऱ्यांमधील दोन पक्षातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.