शहरातील सर्जेपुरा भागातील सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणेशमूर्तीची विटंबना झाल्याचे निदर्शनास आल्याने तक्रारीनंतर तोफखाना पोलिसांनी अज्ञात तरुणांच्या टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित मूर्तीचे पोलिसांनी विसर्जन केले. आज, शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे सर्जेपुरा परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर तो निवळला.
यासंदर्भात निळकंठेश्वर मित्रमंडळाचे अमोल दत्तात्रेय खोडे (रा. सर्जेपुरा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार ८ ते १० जणांच्या टोळक्याविरुद्ध धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल केला आहे. मोटारसायकलवरून आलेल्या टोळक्याने हे दगडफेक करून हे कृत्य केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. माहिती मिळताच आ. संग्राम जगताप, माजी आमदार अनिल राठोड, शिवसेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम घटनास्थळी आले होते. काही वेळ जमावाने घोषणाही दिल्या.
तत्पूर्वीच जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी, अतिरिक्त अधीक्षक पंकज देशमुख, उपअधीक्षक बजरंग बनसोडे तेथे पोहोचले होते. पोलीस बंदोबस्तात बाळाजी बुवा विहिरीत मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. परिसरातील काही दुकानदारांनी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी करून आरोपींची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक मोरे करत आहेत.