Disha Salian case FIR latest update : दिशा सालियान मृत्यू प्रकरणात सीबीआयने FIR दाखल केली आहे. या एफआयआरमध्ये आदित्य ठाकरेंचं नाव आहे, त्याच प्रमाणे सूरज पांचोली, रिया चक्रवर्ती यांचीही नावं आहेत, असा दावा दिशा सालियानचे वडील सतीश सालियान यांनी केला आहे. याप्रकरणी आता पहिल्यांदाच संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई पोलिसांच्या तपासावर विश्वास

संजय राऊत म्हणाले, “तुम्हाला माहित आहे की या संपूर्ण विषयावर मी कधीही बोललो नाही. मी माझं मत व्यक्त केलं नाही, हा अत्यंत संवेदनशील विषय आहे. एका मुलीच्या चारित्र्याविषयीचा हा विषय आहे. तिच्या कुटुंबावर कोसळलेला आघात आहे. तिचा मृत्यू दुर्दैवी आहे. त्या संपूर्ण प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी वारंवार केला. मुंबई पोलिसांच्या इंटिग्रेटीवर शंका घेता येणार नाही. महाराष्ट्रात आता शिवसेनेचं सरकार नाहीय.”

आदित्य ठाकरेंचा दुरान्वये संबंध नाही

“राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नसून देवेंद्र फडणवीस आहेत. गृहमंत्रीही तेच आहेत. त्यांच्याच काळात या प्रकरणाचा तपास पूर्ण होऊन क्लोजर रिपोर्ट देण्यात आला. त्यामध्ये आदित्य ठाकरे यांचा या प्ररणात दुरान्वयेही संबंध नाही, असं सांगण्यात आलं. विरोधकांचं सरकार असताना मुंबई पोलिसांनी निष्पक्षपणे तपास करून कुटुंबाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. जे जे आरोप विरोधकांनी केले त्यादिशेने तपास केला. आदित्य ठाकरेंचा दुरान्वये संबंध नाही, असा कोणताही पुरावा नाही”, असं संजय राऊत म्हणाले.

“राजकीय हेतुने प्रेरित पुन्हा पुन्हा या विषयावर चर्चा केली जाते आणि त्या मुलीच्या आणि कुटुंबाच्या अब्रुचे धिंडवडे काढले जात आहे. हा आता राजकीय आखाडा झाला आहे. या राज्याच्या संस्कृतीला हे शोभणारं नाही. हे षडयंत्र आहे. न्यायालयाने या प्रकरणात स्पष्टपणे सांगितलं की जोपर्यंत तपास होत नाही तोपर्यंत कोणीही आरोपी आहे असं गृहित धरू नका. पण तरीही मी कालपासून पाहतोय की काही मीडियाची लोक मोठमोठ्याने ओरडत असून संशय निर्माण केला जात आहे. हे राजकीय षडयंत्र असून राजकीय कारस्थान आहे. ठाकरे कुटुंबाचं महाराष्ट्रात स्थान आहे , मराठी माणसाच्या हृदयात जे स्थान आहे त्याला डाग लावण्याचा प्रयत्न दिल्लीच्या माध्यमातून सुरू आहे. मी इतकंच सांगेन याही प्रकरणात बदनामीच्या मोहिमेविरोधात आम्ही लढत राहू”, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

तसंच, सीबीआयने तटस्थपणे तपास करायला काहीच हरकत नाही. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने मी प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणार नाही. खोटे आरोप, बदनामी, मोहिमा हे सातत्याने आमच्या वाट्याला आलं असून त्यातून आम्ही तावून सुलाखून बाहेर पडलो आहे. सर्वोच्च न्यायालयात निकाल लागण्याची शक्यता आहे, त्या निकालामुळे महाराष्ट्रात घडामोडी घडणार असून उलथापालथ होणार आहे, त्याचा परिणाम देशावर होणार आहे”, असंही ते म्हणाले.

आदित्य ठाकरेंचं नाव का?

डिलिमिटेशनला पाठिंबा देण्याकरता आणि आदित्य ठाकरेंनी सरकारविरोधात सुरू केलेली मोहिम थांबावी म्हणून आदित्य ठाकरेंचं नाव यात गोवण्यात आल्याचा दावा संजय राऊतांनी केला. ते पुढे म्हणाले, “डिलिमिटेशनला पाठिंबा देण्याकरता सातत्याने दबाव निर्माण केला जात आहे. त्यामुळे हा दबाव असेल, असा दावा करत संजय राऊत पुढे म्हणाले, महाराष्ट्रात अन्यायाविरोधात लढाई सुरू आहे, सातत्याने आदित्य ठाकरे केंद्रस्थानी आहेत. महानगर पालिकांतील विविध प्रकरणे ते बाहेर काढत असल्याने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही.”

दोन महान नेत्यांच्या बैठकीत घडामोडी

“१६ पानांच्या एफआयरमधील एकच पान कसं बाहेर येतं? रविवारी सह्याद्री विश्रामगृहावर एक बैठक झाली. त्या बैठकीनंतर दोन महान नेते एकाच गाडीतून एशियाटीक लायब्ररीत गेले. त्या बैठकीत आणि त्या प्रवासात जे ठरलं त्यानुसार ही एफआयरची पानं लिहिलं गेली आणि मग पानं बाहेर आलीत. मी कधीच आरोप करत नाही, मी वस्तुस्थिती आणि वास्तविकता सांगतो”, असंही संजय राऊतांनी स्पष्ट केलं.