scorecardresearch

“सत्तेच्या खुर्च्या उबवून ज्यांच्या शरीरात…”; दिशा सालियन प्रकरणावरुन शिवसेनेचा राणे-पाटलांवर हल्लाबोल

दिशा सालियन प्रकरणावरुन सध्या राज्यात भाजपा आणि शिवसेना आमने-सामने आल्याचं चित्र दिसत असतानाच शिवसेनेनं यासंदर्भात भाष्य केलंय.

disha salian Case Shivsena vs BJP
मागील काही दिवसांपासून या प्रकरणावरुन राज्यामधील राजकारण तापलंय (फाइल फोटो)

अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर राहिलेल्या दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची मागील काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणामध्ये चर्चा सुरु असतानाच दिशाच्या आई वडिलांनी बुधवारी राज्य महिला आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमासमोर येऊन त्यांनी आपल्या मुलीची बदनामी राजकारण्यांनी थांबवावी अशी मागणी केली. दिशा सालियन प्रकरणावरुन सध्या राज्यात भाजपा आणि शिवसेना आमने-सामने आल्याचं चित्र दिसत आहे. भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि आमदार नितेश राणे यांनी मागील काही दिवसांमध्ये या प्रकरणावरुन शिवसेनेला लक्ष्य केल्यानंतर आज शिवसेनेनं या प्रकरणावर आपली भूमिका सामनाच्या अग्रलेखातून स्पष्ट केलीय.

गरळ ओकण्याचा भस्म्यारोग
“खून आणि बलात्कार यावर भारतीय जनता पक्षाचे लोक अलीकडे अधिकारवाणीने बोलताना दिसत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याकामी पुढाकार घेतला असून मृत महिलांची यथेच्छ बदनामी त्यांनी सुरू केली आहे. दिशा सालियन या तरुणीची आत्महत्या सगळय़ांनाच अस्वस्थ करून गेली. दिशा सालियन तिच्या मित्राबरोबर एका पार्टीत होती. त्यानंतर तिने गॅलरीतून स्वतःला झोकून दिले व आत्महत्या केली. दिशाच्या आत्महत्येचा संबंध सुशांतसिंह राजपूत प्रकरणाशी जोडण्याचा प्रयत्न झाला. त्याबाबत अनेक कथा आणि उपकथानकांचा जन्म झाला. या सर्व प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस व सीबीआयने केला. त्यातून सर्व आरोप व संशयांना उत्तरे मिळाली. दिशा सालियनवर मृत्यूपूर्वी बलात्कार झाला असे काही राजकीय लोकांनी तेव्हाही उठवले, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट तसे सांगत नाही, तरीही भाजपचे पुढारी त्यांच्या मनास येईल तसे बरळत आहेत व या मुलींची मृत्यूनंतरही बदनामी करीत आहेत. केंद्रीय मंत्रीपदावरील व्यक्ती असलेल्याने तरी हे भान राखायला हवे. चंद्रकांत पाटलांच्या बाबतीत ही अपेक्षा ठेवता येणार नाही. या लोकांना गरळ ओकण्याचा जो भस्म्यारोग जडला आहे, त्यामुळे दिशा सालियनच्या आई-वडिलांना जगणे कठीण झाले आहे,” असं शिवसेनेनं म्हटलंय.

नक्की वाचा >> “संजय राऊतांनी ठणकावून सांगितलं की, यापुढे दिशा सालियन प्रकरणावर…”; नितेश राणेंनी मानले मुंबईच्या महापौरांचे आभार

त्यांच्या मस्तकातच खून व बलात्काराचे किडे
“राणे-पाटलांच्या घाणेरड्या वक्तव्यांनंतर दिशाच्या माता-पित्यांनी प्रथमच मीडियासमोर येऊन सांगितले की, ‘‘घाणेरडे राजकारण थांबवा. आम्ही आमची एकुलती एक मुलगी गमावली आहे. आता मृत्यूनंतर तरी तिची अशी बदनामी करू नका.’’ दिशाच्या आईच्या अश्रूंचा बांध फुटलाय व त्याच अवस्थेत तिने सत्य सांगितले, ‘‘एक मोठी बिझनेस डील तुटल्याने तिला प्रचंड नैराश्य आले. त्यामुळेच तिने आत्महत्या केली हे तपासात निष्पन्न झाले. मग तिची व आमची बदनामी का करता? हे असेच सुरू राहिले तर आम्हालाही आत्महत्या करावी लागेल व त्यास आमच्या मुलीवर घाणेरडे आरोप करणारे राजकारणी जबाबदार असतील.’’ एकुलती एक मुलगी गमावलेल्या माता-पित्यांचा हा आक्रोश आहे. दिशा सालियनचा मृत्यू दुर्दैवी आहे, तितकेच मृत्यूनंतर भाजपावाल्यांनी तिचे जे धिंडवडे काढले ते अमानुष आहेत. त्यांच्या मस्तकातच खून व बलात्काराचे किडे सदैव वळवळत आहेत. त्यातूनच ही अशी विकृती जन्मास येते,” अशी टीका लेखामधून करण्यात आलीय.

नक्की वाचा >> दिशा सालियन प्रकरण : नितेश राणेंनी केला राज ठाकरेंचा उल्लेख; म्हणाले, “राज ठाकरेंची शिवसेनेमधील…”

भाजपामधील महिलांना ही विटंबना मान्य आहे का?
“बलात्कार पीडितेचे नावही कायद्याने जाहीर करता येत नाही, पण इथे तर बलात्कार झाला नसतानाही तिच्या मृत्यूनंतर तिच्या प्रतिष्ठेवर व अब्रूवर घाला घातला जात आहे. याबद्दल या राजकीय बलात्काऱ्यांना कठोर शिक्षा कायद्याच्या कचाटय़ातच व्हायला हवी. दिशाची आई हात जोडून सांगतेय की, माझ्या मुलीने आत्महत्या केलीय हे निष्पन्न झाल्यावरही दोन वर्षांनी फाईल उघडून तिच्यावर अशी चिखलफेक का करता? भारतीय जनता पक्षातील बाईमाणसं महिलांच्या सन्मानाच्या, सुरक्षेच्या, महिलांच्या प्रतिष्ठेच्या गमजा मारीत असतात. या बाईमाणसांना दिशा सालियनच्या बाबतीत सुरू असलेली मृत्यूनंतरची विटंबना मान्य आहे का?,” असा प्रश्न विचारण्यात आलाय.

मृतदेह योगी सरकारने जबरदस्तीने जाळला
“दिल्लीतील निर्भया कांडातही त्या अभागी मुलीचे नाव शेवटपर्यंत उघड झाले नव्हते. ही प्रकरणे अत्यंत संवेदनशील असतात. हाथरस प्रकरणात तर त्या अभागी मुलीवर नराधमांनी बलात्कार करून मारले व तिचा मृतदेह योगी सरकारने जबरदस्तीने जाळला. महाराष्ट्राने लेकी-सुनांचा सदैव सन्मान केला. त्यांच्या सुरक्षेसाठी पराकाष्ठा केली. सावित्रीच्या लेकी म्हणून येथे महिलांचा सन्मान केला जातो. लेकींवर अन्याय करणाऱ्यांची गय केली जात नाही. महाराष्ट्राला मन आहे व ते लेकी-सुनांच्या बाबतीत हळवे आहे,” असं लेखात म्हटलंय.

नक्की वाचा >> दिशा सालियन प्रकरणात कोणाला वाचवण्याचा प्रयत्न सुरु आहे? विचारणाऱ्या नितेश राणेंना रुपाली चाकणकरांचं उत्तर, म्हणाल्या…

राजकीय बदनामीचा बलात्कार करणाऱ्यांना…
“सत्तेच्या खुर्च्या उबवून ज्यांच्या शरीरात अहंकाराची गरमी वाढली आहे, त्यांच्या संवेदना मरण पावल्यानेच ते दिशा सालियनची मृत्यूनंतर बदनामी करीत आहेत. महाराष्ट्रद्वेष्ट्या भाजपा पुढाऱ्यांना कठोर शब्दात हाणल्यावर भाजपातील ज्या बाईमाणसांचा थयथयाट सुरू होतो, ती बाईमाणसं एका मृत अबलेच्या विटंबनेवर गप्प का आहेत? अर्थात कायद्याने गप्प बसू नये. राजकीय बदनामीचा बलात्कार करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवायलाच हवी,” असं लेखाच्या शेवटी म्हटलंय.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Disha salian case shivsena slams narayan rane and chandrakant patil scsg

ताज्या बातम्या