Aaditya Thackeray Defamation Notice Update: आदित्य ठाकरेंना ५०० कोटी रुपयांच्या मानहानीची नोटीस सुपूर्द करण्यासाठी दिशा सालियनचे वडील सतीश सालियन वकिलांसह आज मातोश्री निवासस्थानी पोहोचले. यावेळी शिवसैनिकही त्यांना अडविण्यासाठी मातोश्रीवर पोहोचल्यानंतर काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. माध्यम प्रतिनिधी आणि पोलिसांचा गराडा मातोश्री निवासस्थानाबाहेर पाहायला मिळाला. अखेर आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी ही नोटीस स्वीकारल्यानंतर सतीश सालियन आणि त्यांचे वकील याठिकाणाहून निघून गेले. मात्र तत्पूर्वी त्यांनी माध्यमांशी बोलताना अनेक गंभीर दावे केले.
दिशा सालियन मृत्यू प्रकरणी सीबीआयने एफआयआर दाखल केल्यानंतर आदित्य ठाकरे यांचा त्यात उल्लेख असल्याची माहिती समोर आली. यानंतर आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नाही. एवढेच नाही तर आपण दिशा सालियनला ओळखतही नव्हतो आणि कधीही भेटलो नाही, असा दावा केला होता.
या दाव्यानंतर दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी वकिलांमार्फत मानहानीची नोटीस पाठवणार असल्याचे सांगितले होते.
‘देवच मला नियंत्रित करू शकतो’
सतीश सालियन यांनी मातोश्रीवर पोहोचण्यापूर्वी माध्यमांशी संवाद साधला होता. सतीश सालियन यांच्यावर कोणाचे तरी नियंत्रण आहे, असा आरोप शिवसेनेचे (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी केला होता. यावर प्रत्युत्तर देताना सतीश सालियन म्हणाले, माझ्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. फक्त देव माझ्यावर नियंत्रण करू शकतो.
आदित्य ठाकरेंचे वकील काय म्हणाले?
आदित्य ठाकरेंचे वकील म्हणाले की, सतीश सालियन यांच्या वकिलांनी इथे आणलेली नोटीस मी स्वीकारत आहे. सदर नोटीस आम्हाला वाचावी लागेल. त्यानंतर त्यावरील प्रतिक्रिया आम्ही देऊ. सध्यातरी सही, शिक्का देऊन आम्ही प्रत स्वीकारत आहोत.
शिवसैनिक मातोश्रीबाहेर
सतीश सालियन मातोश्रीवर येणार असल्याचे कळताच स्थानिक कार्यकर्त्यांनी मातोश्रीबाहेर जमण्यास सुरुवात केली होती. याबाबत वृत्तवाहिन्यांशी बोलत असताना काही कार्यकर्त्यांनी सांगितले की, इथे येण्यासाठी आम्हाला कोणताही आदेश देण्यात आलेला नाही. आम्हीही दोन-तीन दिवसांपासून वृत्तवाहिन्यांवर त्यांचे बाईट ऐकत आहोत. आज इथे गर्दी पाहून आम्ही थांबलो. मातोश्रीचे वर्चस्व पाहवत नसल्यामुळे काही नेत्यांकडून ही षडयंत्र रचले जात आहेत. आदित्य ठाकरेंसारखे युवा नेतृत्व बदनाम करण्यासाठी याप्रकारची खेळी केली जात असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला.
‘ते रोज खोटं बोलतात’ – सतीश सालियन
मानहानीची नोटीस आदित्य ठाकरेंच्या वकिलांना दिल्यानंतर सतीश सालियन यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केला. आदित्य ठाकरेंच्या पोस्टबद्दल प्रश्न विचारला असता सालियन म्हणाले, “ते रोज खोटं बोलत आहेत. यात ते तरबेज आहेत.”
सतीश सालियन यांनाच अब्रू आहे का? – संजय राऊत
सतीश सालियन हे मातोश्रीवर येण्याबाबत माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, सतीश सालियन यांनाच फक्त अब्रू आहे आणि आम्हाला नाही? तुम्ही कुणाच्या तरी हातचे बाहुले बनून ठाकरे कुटुंबावर चिखलफेक करत आहात. आमच्याही प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. मी पूर्वीही म्हणालो, काही राजकीय नेत्यांनी सालियन यांचा वापर केला आहे. संयमाचा बांध तुटला तर मीही या प्रकरणात बोलण्यास मागे पुढे पाहणार नाही.
