scorecardresearch

अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे लोकार्पण केल्याचा दावा

या परिसराला राज्य राखीव दलाच्या दोन तुकडय़ांसह सुमारे दीड हजार पोलीस कर्मचाऱ्यांचा जागता पहारा आहे.

(संग्रहित छायाचित्र)

स्मारक परिसरात संचारबंदी; भाजप तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद

सांगली: सांगली महापालिकेने उभारलेल्या अहिल्यादेवी होळकर स्मारक परिसरात संचारबंदी लागू असताना ड्रोनच्या माध्यमातून रविवारी पुष्पवृष्टी केली. यामुळे स्मारकाचे लोकार्पण झाले असल्याचा दावा भाजपचे प्रवक्ते आ. गोपीचंद पडळकर यांनी केला असून या प्रकरणी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

कूपवाड-विजयनगर  मार्गावर उभारण्यात आलेल्या अहिल्यादेवी स्मारकाचे लोकार्पण २ एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. याला विरोध करीत रविवारी सामान्य मेंढपाळाच्या हस्ते लोकार्पण करण्याचे भाजपने जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर स्मारक परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली होती. भारत सूतगिरणीपासून आंदोलकांना रोखण्यासाठी अडथळे लावण्यात आले होते.

 आ. पडळकर यांच्यासह आ. सदाभाऊ खोत, आ. सुधीर गाडगीळ, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, नगरसेवक शेखर इनामदार, संगीता खोत, धीरज सूर्यवंशी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते धनगरी ढोलाच्या, हालगीचा निनाद करीत येळकोट, येळकोट जयमल्हार अशा घोषणा देत पोलिसांचा अडथळा पार करून प्रतिबंधित क्षेत्रात घुसले. राजे मल्हारराव होळकर चौकामध्ये या सर्वाना पुन्हा अडविण्यात आले. या परिसराला राज्य राखीव दलाच्या दोन तुकडय़ांसह सुमारे दीड हजार पोलीस कर्मचाऱ्यांचा जागता पहारा आहे. संपूर्ण स्मारकाभोवती लोखंडी पत्रे लावण्यात आले आहेत.  आंदोलकांशी पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असताना स्मारकांवर ड्रोनच्या मदतीने फुलांचा वर्षांव करण्यात आला. या प्रकरणी ड्रोन मालकांसह तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच पुष्पवृष्टीसाठी वापरण्यात आलेले ड्रोनही ताब्यात घेतले आहे. अहल्यादेवी स्मारकाचे लोकार्पण झाले असल्याचा दावा आ. पडळकर यांनी केला असून जोपर्यंत ताब्यात घेण्यात आलेल्या कार्यकर्त्यांची मुक्तता केली जात नाही, तोपर्यंत आपण मागे हटणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dispute between bjp and ncp over ahilyabai holkar memorial inauguration zws

ताज्या बातम्या