उजनीच्या पाण्यावरून सोलापूर – पुणे जिल्ह्यात वाद

उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी इंदापूरला देण्याबाबत सिंचन भवन येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.

संग्रहित छायाचित्र

उजनीचे पाच टीएमसी पाणी इंदापूरला देण्याचा प्रस्ताव

पुणे : उजनी धरणातून पाच अब्ज घनफू ट (टीएमसी) पाणी इंदापूरला देण्यावरून सोलापूर आणि पुणे जिल्ह्यात सध्या वाद रंगला आहे. याबाबत सोमवारी पुण्यातील सिंचन भवन येथे आयोजित बैठकीतही त्याचे पडसाद उमटले. सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत दोन्ही बाजूच्या प्रतिनिधींनी वाद घातला. त्यामुळे चर्चा निष्फळ ठरली असून पुन्हा नव्याने बैठक आयोजित करणार असल्याचे भरणे यांनी जाहीर के ले.

उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी इंदापूरला देण्याबाबत सिंचन भवन येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, या बैठकीत दोन्ही बाजूच्या प्रतिनिधींनी राज्यमंत्री भरणे यांच्यासमोरच वाद घातला. सोलापुरातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. तसेच उजनी, खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील पाणी आणि सांडपाण्याची माहितीही या वेळी उपस्थितांना देण्यात आली. मात्र, त्यांचे समाधान झाले नाही.

सोलापूरचे पाणी कमी होणार नसून सोलापूर जिल्ह्यायातील पाण्याच्या योजना पूर्ण करू, येत्या दहा महिन्यांत  सोलापूरच्या पाण्याचा प्रश्न नक्की सोडवू, असे आश्वासन राज्यमंत्री भरणे यांनी या वेळी दिले. मात्र, सोलापूरच्या शेतकऱ्यांचा वाढता विरोध लक्षात घेता पुन्हा नव्याने बैठक घेतली जाणार असल्याचे भरणे यांनी जाहीर के ले.

नेमका वाद काय?

उजनी जलाशयाच्या उध्र्वबाजूस बिगर सिंचन पाणी वापरातून उपलब्ध होणारे सांडपाणी उजनी जलाशयातून शेटफळगढे येथील नवीन मुठा उजवा कालव्यात उचलले जाणार आहे. खडकवासला स्थिरीकरण सिंचन प्रकल्पातून इंदापूर तालुक्याला पाच टीएमसी पाणी उचलण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. सोलापूर जिल्ह्यायासाठी असणाऱ्या उजनीवर बार्शी उपसा सिंचन योजना (२.५९ टीएमसी), सीना माढा उपसा सिंचन योजना (४.५० टीएमसी), दहिगाव उपसा सिंचन योजना (१.८१ टीएमसी), भीमा सीना जोड कालवा (३.१५ टीएमसी), सांगोला उपसा सिंचन योजना (दोन टीएमसी), एकरूख उपसा सिंचन योजना (३.१६ टीएमसी), आष्टी उपसा सिंचन योजना (एक टीएमसी), मंगळवेढा तालुक्यातील ३५ गावांसाठी सहा टीएमसी, दक्षिण सोलापूरमधील २२ गावांच्या पिण्याच्या पाणीयोजना अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. या योजना मार्गी लावण्याऐवजी सांडपाणी दाखवून पाच टीएमसी पाणी उजनीतून इंदापूरला देण्यास सोलापूर जिल्ह्यायाचा विरोध आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Dispute in tmc pune district from ujani dam akp