कल्पेश भोईर

करोना प्रादुर्भावामुळे सर्वच क्षेत्राचे कंबरडे मोडले आहे. त्यातच शहराच्या विविध ठिकाणच्या भागात सुरू असलेली बांधकामेही ठप्प झाली आहेत. त्यामुळे त्यावर अवलंबून असलेल्या मिस्तरी, बिगारी, रंगारी, सुतार, वीजतंत्री व इतर रोजंदारीवर काम करणाऱ्यांना याचा फटका बसला आहे. हाताला काम नसल्याने या कामगारांवर उपासमारीची वेळ आहे

वसई-विरार शहराचा झपाटय़ाने विकास होत असल्याने वसई, नालासोपारा, विरार, नायगाव यासह इतर विविध ठिकाणच्या भागात इमारतींची, चाळींची बांधकामे ही वेगाने सुरू होती. त्यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्यांनाही यातून चांगला रोजगार मिळत होता. मात्र अचानकपणे फोफावलेल्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशात सर्वत्र टाळेबंदी लागू करण्यात आल्याने सर्वकाही बंद पडले आहे. त्याचा विपरीत परिणाम यावर अवलंबून असलेल्या साखळीवर झाला आहे. दरवर्षी ऑक्टोबर महिन्यापासून बांधकामे उभारण्यास सुरुवात होत असते. जवळपास ही कामे मे महिन्याच्या अखेपर्यंत वेगाने सुरू असतात. करोनामुळे याच हंगामात विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या कामगारांवर मोठी कुऱ्हाड कोसळली आहे. याआधी या कामगारांना महिन्यातून  २० ते २५ दिवस काम असायचे. परंतु हाताला काम नसल्याने आर्थिक समस्या निर्माण होऊन त्याचा परिणाम त्यांच्या कुटुंबीयांवर होताना दिसत आहे. या सर्व अडचणींमुळे कामगारवर्गही नैराश्याच्या गर्तेत अडकल्याचे चित्र आहे.

पैसे अडकल्याने कंत्राटदारही अडचणीत

बांधकामे सुरू असताना व बांधकामे पूर्ण झाल्यावर रंगकाम, सुतारकाम, विजेची तांत्रिक कामे, वेल्डिंग अशी कामे सुरू असतात मात्र, बांधकाम व्यवसायच बंद झाल्याने ही कामे हातून निसटली आहेत. दुसरीकडे कामगार टिकवून ठेवण्यासाठी काहींना आधीच आगाऊ  पैसे दिले आहेत. जेणेकरून पुढील सर्व काम सुरळीत सुरू राहील. पण करोनामुळे सर्वच गोष्टीवर पाणी सोडावे लागल्याने अडचणी निर्माण झाल्या असल्याचे या कंत्राटदारांनी सांगितले.

पावसाळ्यातील उदरनिर्वाहाचा प्रश्न

बांधकामावर काम करणारे मिस्तरी, कामगार व त्यांच्या हाताखाली काम करणारे बिगारी यांचे हातावर पोट आहे. दररोज मजुरी करायची व त्यातून मिळणाऱ्या रकमेतून बाजार करून आपला संसार चालवायचा असा त्यांचा क्रम ठरलेला आहे. मात्र मागील दोन महिन्यांपासून सर्व काही ठप्प आहे, त्यामुळे मोठे आर्थिक गणित कोलमडले आहे. सध्या हातात पैसे नसल्याने पोट कसे भरायचे असा प्रश्न भेडसावत असल्याचे या कामगारांनी सांगितले आहे. यंदाच्या वर्षी कामाच्या हंगामातच असे बिकट दिवस आल्याने पुढे येणाऱ्या पावसाळ्यात कसा काय उदरनिर्वाह करणार हा प्रश्न आहे.