राजेश टोपे यांचा केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे प्रस्ताव

जालना  :  राज्यात करोनाच्या दुसऱ्या लशीचे प्रमाण ३० ते ३५ टक्के आहे. हे प्रमाण वाढवायचे असेल, तर कोविशिल्डच्या दोन लशींमधील अंतर कमी करण्याची आवश्यकता आहे. अलिकडेच दूरदृश्य संवादाच्या माध्यमातून झालेल्या बैठकीच्या वेळी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख बाठिया यांच्यासमोर आपण हा प्रस्ताव मांडला असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी येथे सांगितले.

 टोपे म्हणाले, कोव्हॅक्सिनच्या दोन मात्रांमधील अंतर २८ दिवस तर कोविशिल्डच्या संदर्भात हे अंतर ८४ दिवस आहे. कोविशिल्डच्या दोन मात्रांमधील अंतर कमी करता येईल का, याचा विचार मात्र शास्त्रीय पद्धतीनेच होईल. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात आयएमसीआर आणि या संदर्भातील अन्य संशोधन संस्थांचा अभिप्राय यासाठी महत्त्वाचा असेल. येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत राज्यात लशीची पहिली मात्रा १०० टक्के देण्याचे प्रयत्न आहेत. आणखी दोन ते अडीच कोटी लाभार्थींनी पहिली मात्रा घेतलेली नाही.  लशीचे सक्तीकरण कायद्यात बसत नसले तरी जनहितासाठी ते आवश्यक असल्याने त्यासाठी प्रबोधन महत्त्वाचे आहे. कायद्याच्या चौकटीत बसवून यासाठी काय करता येऊ शकेल या संदर्भात राज्याच्या महाधिवक्त्याचा सल्ला घेण्याचा विचार आहे. एखादी धार्मिक व्यक्ती लस घेणे हितकारक नाही असे म्हणत असेल तर ते त्यांचे अज्ञान आहे. अशा मंडळींचे गैरसमज दूर करणे हा यावरील मार्ग आहे. स्थानिक पातळीवर याकरिता जनतेचे प्रबोधन करण्याचे काम तेथील नेतृत्वाने करावे, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे लसीकरण वाढण्यास मदत होईल, असेही टोपे म्हणाले.

 सहा कोटी ३७ लाख चाचण्या

 शनिवारी सकाळपर्यंत राज्यात सहा कोटी ३७ लाख ४७ हजारांपेक्षा अधिक करोना नमुन्यांची प्रयोगशाळा चाचणी करण्यात आली. यापैकी जवळपास ६६ लाख २२ हजार म्हणजे १०.३९ टक्के नमुने करोनाबाधित निघाले. जवळपास ६४ लाख ६६ हजार म्हणजे ९७.६४ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले. राज्यातील करोना रुग्णांमधील मृत्यूचे प्रमाण २.१२ टक्के आहे.