Coronavirus: करोना प्रतिबंधासाठी विभागीय आयुक्तांना एकूण १७१ कोटींच्या निधीचे वाटप

करोना प्रतिबंधासाठी आवश्यक असणारी वैद्यकीय यंत्रसामुग्री, साहित्य व औषधे खरेदी करण्यासाठी हा निधी देण्यात आला आहे.

(प्रतिकात्म छायाचित्र)

करोना प्रतिबंधासाठी आवश्यक असणारी वैद्यकीय यंत्रसामुग्री, साहित्य व औषधे खरेदी करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून विभागीय आयुक्तांना आतापर्यंत एकूण १७१ कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

करोना विषाणूचा राज्यातील वाढता फैलाव लक्षात घेता मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे येणारा निधी करोना विषाणूच्या संसर्गावर मात करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांवर खर्च करता येतो का? याबाबतीत आयुक्त, जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागाचे अधिकारी यांची वडेट्टीवार यांनी बैठक घेतली. यावेळी मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक अभय यावलकर यांच्याशी चर्चा करून विभागीय आयुक्तांना तातडीने निधी वितरित करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विभागीय आयुक्तांना आत्तापर्यंत १७१ कोटी इतका निधी वितरित करण्यात आला असल्याची माहिती मंत्री वडेट्टीवार यांनी दिली.

वडेट्टीवार म्हणाले, कोरोना आजार नियंत्रणासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून विभागीय आयुक्तांना आज ८१ कोटीचा निधी दिला. हा निधी तातडीने विभागीय आयुक्तांना वितरित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विभागवार माहिती देताना वडेट्टीवार म्हणाले कोकण विभागासाठी ४० कोटी, पुणे विभागासाठी १५ कोटी, नागपूर विभागासाठी १० कोटी, अमरावती विभागासाठी ६ कोटी, औरंगाबाद विभागासाठी १० कोटी, याप्रमाणे एकूण ८१ कोटींचा निधी वितरित केला.

पहिल्या टप्यात कोरोना प्रतिबंधासाठी कोकण विभागासाठी १५ कोटी, पुणे विभागासाठी १० कोटी, नागपूर विभागासाठी ५ कोटी, अमरावती विभागासाठी ५ कोटी, औरंगाबाद विभागासाठी ५ कोटी, नाशिक विभागासाठी ५ कोटी याप्रमाणे ४५ कोटी निधी वितरीत केला. तर दुसऱ्या टप्यात कोकण विभागासाठी १५ कोटी, पुणे विभागासाठी १० कोटी, नागपूर विभागासाठी ५ कोटी, अमरावती विभागासाठी ५ कोटी, औरंगाबाद विभागासाठी ५ कोटी, नाशिक विभागासाठी ५ याप्रमाणे ४५ कोटी निधी वितरीत करण्यात आलेला आहे. असे एकूण ९० कोटी आणि तिसऱ्या टप्यात ८१ कोटी असे आतापर्यंत एकूण १७१ कोटी निधी वितरित केल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली.

या निधीतून करोनाबाधित व्यक्तींसाठी विलगीकरण कक्ष स्थापन करणे, तात्पुरती निवासी व्यवस्था करणे, अन्न, कपडे वैद्यकीय देखभाल, नमुने गोळा करण्यावरील खर्च तपासणी, छाननीसाठी सहाय्य, अतिरिक्त चाचणी प्रयोगशाळा स्थापन करण्याचा खर्च व उपभोग्य वस्तू, अग्निशमन, पोलीस, स्थानिक स्वराज्य संस्था व आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक संरक्षणासाठी प्रतिरोधक साधनांचा खर्च व व्हेंटिलेटर, हवा शुद्धीकरण यंत्र, थर्मल स्कॅनर्स व इतर साधनांसाठी खर्च करण्यासाठी हा निधी देण्यात आला आहे. राज्यात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत निधी कमी पडू देणार नाही. असे आश्वासन देत राज्यातील जनतेने काळजी घ्या, सतर्क राहा, आपल्याच घरी रहा असं आवाहन वडेट्टीवार यांनी केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Distribution of rs 171 crore to all divisional commissioners for corona virus prevention aau

Next Story
नाकर्त्यां लोकप्रतिनिधींमुळे पूरग्रस्त अन्नछत्रात!
ताज्या बातम्या