भगवानगडावर दसरा मेळावा घेण्याची तयारी करणा-या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांना जिल्हा प्रशासनाने दणका दिला आहे. प्रशासनाने मेळाव्यासाठी पंकजा मुंडे यांना जागा देण्यास नकार दिला असून आता जागा मिळणार नसेल पंकजा मुंडे मेळावा कुठे घेणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

भगवानगडावर दसरा मेळावा घेण्यासाठी पंकजा मुंडे यांचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. भगवानगडावरुन राजकीय भाषण करु देणार नाही अशी भूमिका महंत नामदेव शास्त्री यांनी घेतल्याने पंकजा मुंडे यांच्या मेळाव्यात अडथळे निर्माण झाले. मात्र दस-याला भगवानगडावर जाणारच अशी ठाम भूमिका पंकजा मुंडे यांनी घेतल्याने वाद चिघळला आहे.  दसरा मेळाव्यासाठी पंकजा मुंडे यांनी भगवानगडावरील ४० गुंठे जागा मागितली होती. मात्र दस-याच्या पूर्वसंध्येला जिल्हा प्रशासनाने पंकजा मुंडे यांना जागा देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे मुंडे कुटुंबीयांची भगवानगडावरील दसरा मेळाव्याची परंपरा यंदा खंडीत पडण्याची चिन्हे आहेत.

दरम्यान, शिवाजी पार्कपेक्षा उद्या आमचे लक्ष्य फक्त भगवानगडावरच असेल असे सांगतभाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेला चिमटा काढला आहे.  आम्ही पंकजा मुंडे यांच्या पाठिशी असून त्या भगवानगडावरुन काय भूमिका मांडतात याकडे आमचे लक्ष आहे असेही ते म्हणालेत. तर महादेव जानकर यांनीदेखील पंकजा मुंडे या भगवानगडावर जाणारच आमचा त्यांना पाठिंबा आहे असे सांगितले होते. त्यामुळे भगवानगडावरील दसरा मेळावा हा पंकजा मुंडे यांच्यासाठी प्रतिष्ठेचा विषय बनला आहे.