“चंद्रपूर जिल्ह्यातील ‘म्‍युकरमायकोसिस’च्‍या रूग्‍णांसाठी खनिज विकास निधी अंतर्गत ५ लाखांपर्यंत खर्च जिल्‍हा प्रशासनाने उचलावा!”

माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली मागणी

संग्रहीत

महात्‍मा फुले जन आरोग्‍य योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्‍हयातील सहा रूग्‍णालयात म्युकरमायकोसिस या आजारावर उपचार करता येत नाही, शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्‍णालय तसेच सामान्‍य रूग्‍णालय येथे या आजारावरील उपचाराशी संबंधित यंत्रसामुग्री उपलब्‍ध नाहीत. अनेक रूग्‍ण खासगी रूग्‍णालयात उपचारासाठी दाखल होत आहेत. साधारण पाच ते साडेपाच लाख रूपये खर्च या आजारावरील उपचारासाठी येतो. हा खर्च सर्वसामान्‍य रूग्‍णांना परवडणारा नाही. त्‍यामुळे चंद्रपूर जिल्‍हयातील म्युकरमायकोसिस या आजाराच्‍या रूग्‍णांवर खनिज विकास निधी अंतर्गत ५ लक्ष रूपये इतका खर्च जिल्‍हा प्रशासनाने उचलावा, अशी मागणी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

यासंदर्भात जिल्‍हाधिकारी अजय गुल्‍हाने यांना पाठविलेल्‍या पत्रात मुनगंटीवार यांनी म्‍हटले आहे की, ”चंद्रपूर जिल्‍हयात करोना महामारीच्‍या संकटात म्युकरमायकोसिस या आजाराचे संकट उद्भवले आहे. या क्षणापर्यंत म्युकरमायकोसिसचे ५४ रूग्‍ण आपल्‍या जिल्‍हयात आढळले आहेत. त्‍यापैकी ३३ रूग्‍णांवर शस्‍त्रक्रिया झाल्‍या असून एकाचा मृत्‍यु झाला आहे. हा बुरशीजन्‍य आजार जीवघेणा असून अनेक रूग्‍णांना आपले डोळे, जबडा गमवावा लागतो व आयुष्‍यभर त्‍याची भरपाई होवू शकत नाही. यासंदर्भात सार्वजनिक आरोग्‍य मंत्री राजेश टोपे यांच्‍याशी पाठपुरावा करून आम्‍ही सदर आजाराचा समावेश महात्‍मा फुले जनआरोग्‍य योजनेअंतर्गत करण्‍याचा निर्णय घ्‍यायला लावला. या योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्‍हयात सहा खासगी रूग्‍णालये आहेत. मात्र त्‍यापैकी एकाही रूग्‍णालयात म्युकरमायकोसिस या आजारावर उपचार करता येवू शकत नाही. सामान्‍य रूग्‍णालय तसेच शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्‍णालय येथे या आजारावर उपचारासाठी यंत्रसामुग्री उपलब्‍ध नाही. अनेक रूग्‍ण खासगी रूग्‍णालयांमध्‍ये उपचारार्थ दाखल होत आहेत. या ठिकाणी प्रत्‍येक रूग्‍णावर पाच ते साडेपाच लाख रूपये खर्च होतात. त्‍यामुळे रूग्‍णाच्‍या कुटुंबीयांचे आर्थिकदृष्‍टया कंबरडे मोडत आहे, ते कर्जबाजारी होत आहेत.”

तसेच, ”महात्‍मा फुले जनआरोग्‍य योजनेअंतर्गत आपण सदर रूग्‍णांना उपचार देवू शकत नसल्‍याने खनिज विकास निधी अंतर्गत या रूग्‍णांचा पाच लाख रूपये पर्यंतचा खर्च आपण उचलणे आवश्‍यक आहे, किंबहुना ती आपली जबाबदारी आहे. चंद्रपूर जिल्‍हयातील जनता सहनशील आहे. जिल्‍हयात रोज ५०० च्‍या वर करोना रूग्‍ण आढळत आहेत. अशातच म्युकरमायकोसिसचे संकट उद्भवल्‍याने नागरीक अडचणीत सापडले आहेत. ही बाब लक्षात घेता सदर रूग्‍णांचा ५ लाख रूपये पर्यंतचा खर्च आपण खनिज विकास निधीच्‍या माध्‍यमातुन उचलणे गरजेचे आहे, किंबहुना ही आपली जबाबदारी आहे.” असं म्हणत, हे संकट अधिक गडद होण्‍याआधी तातडीने खनिज विकास निधी अंतर्गत सदर रूग्‍णांसाठी ५ लाख रूपये खर्च उचलण्‍याचा निर्णय घेण्‍याची मागणी मुनगंटीवार यांनी केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: District administration should bear the cost up to rs 5 lakhs under mineral development fund for patients with mucormycosis in chandrapur sudhir mungantiwar district msr

ताज्या बातम्या