अहिल्यानगर: पेट्रोल, डिझेल तसेच गॅसचा साठा मुबलक असतानाही तुटवडा असल्याचा खोटा संदेश किंवा चुकीची माहिती समाज माध्यमांवर पसरवल्यास गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले आहेत.
युद्धाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन-तीन दिवसापासून इंधन तुटवडा निर्माण होणार असल्याच्या भीतीतून जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर वाहनचालकांच्या इंधन भरण्यासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. अनेकजण इंधन उपलब्ध होणार नाही, या भावनेतून वाहनात अतिरिक्त इंधन भरून घेताना आढळत आहेत तसेच इंधनाचा अनावश्यक साठाही करण्यास सुरुवात झाली आहे. त्यातून पेट्रोल पंपांवर वाहनचालकांच्या गर्दी उसळली आहे. गॅस टाकींसाठीही रांगा लागलेल्या आहेत. अनेक पेट्रोल पंपांवर इंधन संपल्याचे फलक लावले जात आहेत.
या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस अधीक्षक व पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल व गॅसचा मुबलक साठा आहे. वितरण व्यवस्थाही सुरळीत सुरू आहे. विविध प्रकारच्या समाज माध्यमांवर इंधन तुटवड्याच्या पसरवल्या जाणारी माहिती, बातम्या पूर्णपणे खोट्या व दिशाभूल करणाऱ्या आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व घाबरून जाऊ नये, पेट्रोल पंपांवर विनाकारण गर्दी करू नये असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी केले आहे. पोलिसांच्या सायबर सेलमार्फत समाज माध्यमावर लक्ष ठेवले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील इंधन साठ्याची परिस्थिती समाधानकारक आहे. पेट्रोलची जिल्ह्याची दररोजची आवश्यकता ३०८ किलोलिटर इतकी असून सध्या ८४६ किलोलिटर इतका मुबलक साठा उपलब्ध आहे तसेच डिझेलची रोजची गरज ६८९ किलोलिटर असताना सध्या १४७१ किलोलिटर इतका साठा उपलब्ध आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
याशिवाय प्रमुख तेल कंपन्यांकडून इंधनाचा नियमित पुरवठा विनाअडथळा सुरू असल्याने तुटवड्याची कोणतीही शक्यता नाही. जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा इंधन तुटवडा निर्माण झाला नसल्यामुळे नागरिकांनी इंधनाचे अनावश्यक साठेबाजी करू नये. खोट्या अफवांवर विश्वास ठेवून विनाकारण पेट्रोल पंपावर रांगा लावणे टाळावे. इंधनाचा पुरवठा नियमितपणे सुरू असल्याने नागरिकांनी शांतता व संयम राखून जिल्हा प्रशासनास आवश्यक ते सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
