जिल्हा परिषदेतील बदल्या अखेर स्थगित

प्राथमिक शिक्षक, पदवीधर व मुख्याध्यापक यांच्या उद्यापासून (बुधवार) होणा-या बदल्या अखेर स्थगित ठेवण्याचा निर्णय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी आज सायंकाळी घेतला.

प्राथमिक शिक्षक, पदवीधर व मुख्याध्यापक यांच्या उद्यापासून (बुधवार) होणा-या बदल्या अखेर स्थगित ठेवण्याचा निर्णय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी आज सायंकाळी घेतला. याबाबतची संभ्रमावस्था त्यामुळे मंगळवारी संपली. आता शिक्षण विभागातील केवळ केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी याच दोन पदांवरील कर्मचा-यांच्या बदल्या गुरुवारी होतील.
बदल्यांमधील संभ्रमावस्था दूर झाली असली तरी मुख्याध्यापकपदाच्या नियुक्तीमधील संदिग्धता कायम आहेच. सध्या जिल्हा परिषदेच्या सर्वच संवर्गातील कर्मचा-यांच्या बदलीची प्रक्रिया शनिवारपासून सुरू करण्यात आली आहे. ती शुक्रवारपर्यंत चालेल. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असतानाच बदल्यांची पूर्वतयारी सुरू करण्याचे आदेश दिले गेले होते. आचारसंहिता संपताच बदल्या केल्या जाणार होत्या. त्यानुसार वेळापत्रकही जाहीर करण्यात आले.
सुधारित आदेशामुळे परंतु आरटीईनुसार होणारी पदनिश्चिती व समायोजन त्याच्याआड आले. नंतर १ ली ते ७ वीसाठी मुख्याध्यापक नियुक्तीचा नवा नियम लागू करण्यात आला. पुन्हा प्रथम समायोजन करा नंतर यथावकाश बदल्या करा असा आदेश देण्यात आला. यथावकाश शब्दाने गोंधळ निर्माण केला. त्यामुळे राज्यातील इतर काही जिल्हा परिषदांनी शिक्षण संघटनांच्या दडपणातून बदल्या स्थगित ठेवत समायोजन केले. नगर जिल्हा परिषदेने दोन्हीचे नियोजन केले होते. परंतु सुधारित आदेशामुळे मुख्याध्यापकांचे रविवारी (दि. १८) होणारे जिल्हास्तरीय समायोजन ऐनवेळी रद्द करावे लागले. तर दि. १९ पासून सुरू झालेले तालुकास्तरीय समायोजन अपूर्ण राहिले. अनेक ठिकाणी पदवीधरच्या जागा रिक्त नसल्याने उपाध्यकांचे त्या पदावर केलेले तात्पुरते समायोजन केले गेले आहे. पटसंख्येचा निकष बदलला गेल्याने अतिरिक्त ठरणा-या मुख्याध्यापकांची संख्या बदलली गेली.
या सर्व पार्श्र्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी नवाल यांनी शिक्षणाधिका-यांच्या अहवालानुसार शिक्षक, मुख्याध्यापक व पदवीधर या तीन पदांच्या बदल्या स्थगित ठेवल्या. आता या बदल्या जवळपास रद्दच होतील, अशी चर्चा संघटनांच्या पदाधिका-यांत आहे.
 पदाधिका-यांनी पाठ फिरवली
सध्या जि. प.मधील विविध संवर्गातील कर्मचा-यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे. बदल्या करताना पदाधिका-यांच्या उपस्थितीत कर्मचा-यांचे समुपदेशन करावे, अशी ग्रामविकास विभागाची सूचना आहे. पदाधिका-यांची सूचना लक्षात घेऊन बदल्यांचे वेळापत्रक तयार करण्यात आले. मात्र शनिवारपासून बदल्यांची प्रक्रिया सुरू होऊनही पदाधिकारी त्याकडे फिरकलेले नाहीत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: District council transfer adjourned