अहिल्यानगर : जिल्हा पतसंस्था स्थैर्यनिधी सहकारी संघाच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. नूतन संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्षपदी शिवाजीराव कपाळे व उपाध्यक्षपदी अजिनाथ हजारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षपदासाठी वसुदेव काळे यांनी शिवाजी कपाळे यांचे नाव सुचवले त्यास ज्ञानदेव पाचपुते यांनी अनुमोदन दिले.
उपाध्यक्ष पदासाठी अजिनाथ हजारे यांच्या नावाची शिफारस मिलिंद गंधे यांनी तर विठ्ठल अभंग यांनी अनुमोदन दिले. संघाचे मावळते अध्यक्ष सुरेश वाबळे, वसंत लोढा, नूतन संचालक वसंत कवाद, उमेश मोरगावकर, पुखराज पिपाडा, आशुतोष पटवर्धन, राणीप्रसाद मुंदडा, राजेंद्र खटोड, सुशीला नवले आदी उपस्थित होते.
शिवाजीराव कपाळे म्हणाले, स्थैर्यनिधी संघाच्या माध्यमातून गेल्या पंधरा वर्षांत जिल्ह्यातील पतसंस्थांचे अनेक प्रलंबित प्रश्न सोडवले आहेत. सध्याच्या आव्हानात्मक काळात पदाच्या माध्यमातून पतसंस्था चळवळीतील प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन पतसंस्था फेडरेशनचे राज्याध्यक्ष काका कोयटे यांच्या नेतृत्वाखाली काम करू. ही पतसंस्था चळवळ अधिक पारदर्शी व मजबूत कशी होईल यासाठी प्राधान्य देऊ. आजिनाथ हजारे, सुरेश वाबळे, वसंत लोढा यांची भाषणे झाली.