अहिल्यानगर : पत्नी व लहान मुलाचा खून केल्याच्या आरोपावरून श्रीरामपूरच्या जिल्हा सत्र न्यायालयाने एकास जन्मठेपेची शिक्षा दिली. बलराम दत्तात्रय कुदळे (रा. खैरी निमगाव, श्रीरामपूर) असे या आरोपीचे नाव आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एन. साळवे यांनी या खटल्याचा निकाल दिला. सरकारतर्फे सहायक सरकारी वकील पी. पी. गटणे व एस. ए. दिवेकर यांनी काम पाहिले. खटल्यात एकूण १५ साक्षीदार तपासण्यात आले. सुनावणी प्रक्रियेसाठी पोलीस उपनिरीक्षक व्ही. आर. घाणे, सहायक उपनिरीक्षक पठाण, अंमलदार बर्डे व ठोंबरे यांनी साह्य केले.
खुनाची घटना १४ एप्रिल २०२२ रोजी घडली. बलराम कुदळे याचा अक्षदा प्रकाश बोरावके हिच्याशी विवाह झाला. त्यांना एक मुलगा झाला. कौटुंबिक वादातून बलराम याने पत्नी अक्षदाच्या डोक्यात कुदळीने घाव घालून खून केल्यानंतर सातवर्षीय मुलास आंब्याच्या झाडाला फाशी देऊन ठार मारले.
या अमानुष कृत्याचे छायाचित्र काढून बलरामने पत्नीच्या भावाच्या व्हाॅट्स अप्वर पाठवले आणि त्याला व्हिडिओ कॉल करून ‘तुझ्या बहिणीला आणि भाच्याला मारून टाकले,’ अशी माहिती दिली. ही घटना समजल्यानंतर अक्षदाचा भाऊ महेश बोरावके यांनी, श्रीरामपूर शहर पोलिसांशी संपर्क साधून घटनास्थळी धाव घेतली. अक्षदाचे वडील प्रकाश बोरावके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी बलराम कुदळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.