अलिबाग- रायगड जिल्ह्यातील दिवेआगर येथे पर्यटनासाठी आलेल्या आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. हे सर्वजण पुण्यातील आळंदी येथील रहिवासी आहेत. पुण्यातील आळंदी येथील विनर्स क्लासेस मधील अकरावी आणि बारावीचे ४८ विद्यार्थी सहलीसाठी दिवेआगर येथे आले होते. ज्यात २५ मुले आणि १७ मुलींचा समावेश होता. दुपारी जेवण करून सर्व जण समुद्र स्नानाचा आनंद लुटण्यासाठी उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने यातील आठ जण बुडाले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरीक, वॉटर स्पोर्ट्स चालक आणि पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मदत आणि बचावकार्य सुरू केले. अथक प्रयत्नानंतर आठही जणांना शोधून बाहेर काढण्यात आले. मात्र तोवर सर्वांचा मृत्यू झाला होता. सर्वांचे मृतदेह बोर्ली पंचतन प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. दिघी सागरी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या दुर्घटनेमुळे दिवेआगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृतांची नावे
यश किरण वानखेडे, सोहम तुकाराम भांडवलकर, तन्मय दत्तात्रय वाहिले, कौस्तुभ संदीप दौंड, कैवल्य वासनकर, राजवील वहिले, प्रणव बनसोडे, सुमीत अहिरे अशी या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत.
रायगड जिल्ह्यातल्या दिवेआगर इथल्या समुद्रात बुडून ८ विद्यार्थ्यांचा आज मृत्यू झाला.
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) October 1, 2026
या सर्वांचे मृतदेह हाती आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हे सर्वजण पुण्याचे असल्याचं वृत्त आहे.#Raigad #Diveagar #DiveagarBeach #Pune #PuneStudents #DrowningIncident #SeaAccident pic.twitter.com/pu03xWsTg0
२०१६ मधील मुरुड दुर्घटनेची पुनरावृत्ती
पुण्यातील आबेदा इनामदार महाविद्यालयातील विद्यार्थी मुरुड येथे सहलीसाठी आले होते. समुद्र स्नानाचा आनंद घेत असतांना यातील १४ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला होता. दिवेआगर येथील दुर्घटनेमुळे या घटनेच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या.
