रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या दिवेआगर समुद्रकिनारी एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक दुर्घटना घडली आहे. पर्यटनासाठी आलेल्या पुण्यातील आळंदी परिसरातील एका खासगी कोचिंग क्लासच्या आठ विद्यार्थ्यांचा समुद्राच्या पाण्यात बुडून करुण अंत झाला. या घटनेमुळे संपूर्ण आळंदी आणि पुणे परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

सहलीचा आनंद क्षणात ओसरला

रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पुण्यातील आळंदी येथील ‘विनर्स अकॅडमी’ या खासगी शिकवणी वर्गाची सहल रायगड जिल्ह्यातील दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या दिवेआगर येथे आली होती. या सहलीमध्ये एकूण ४८ जण सहभागी झाले होते; ज्यामध्ये २५ मुले, १७ मुली आणि ६ शिक्षकांचा समावेश होता.

समुद्रात मौजमजा करण्यासाठी विद्यार्थी पाण्यात उतरले असताना अचानक पाण्याचा आणि लाटांचा अंदाज न आल्यामुळे काही विद्यार्थी खोल पाण्यात ओढले गेले. विद्यार्थ्यांना बुडताना पाहून किनाऱ्यावर एकच घबराट पसरली.

स्थानिक नागरिक आणि वॉटर स्पोर्ट्स कर्मचाऱ्यांकडून बचावकार्य

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, वॉटर स्पोर्ट्स चालक आणि पोलिसांनी तात्काळ समुद्रात धाव घेत बचावकार्य सुरू केले. मात्र, पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने ८ विद्यार्थ्यांना वाचवण्यात अपयश आले. शर्थीच्या प्रयत्नांनंतर आठही जणांचे मृतदेह समुद्रातून बाहेर काढण्यात आले आहेत.

पोलीस प्रशासनाकडून पुढील कारवाई सुरू

या दुर्घटनेनंतर रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून माहिती देण्यात आली असून, घटनेचा पुढील तपास आणि आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पोलिसांकडून वेगाने सुरू आहे. या घटनेने मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून पोलीस प्रशासन पीडित कुटुंबियांच्या संपर्कात आहे.