अलिबाग- दिवेआगर समुद्र किनाऱ्यावर आठ विद्यार्थ्यांचा गुरुवारी बुडून मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षेतील त्रृटी पुन्हा एकदा उजागर झाल्या. दिवेआगर समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी जिवरक्षक उपलब्ध नसल्याची तसेच किनारपट्टीवर बचाव उपकरणांचा अभाव असल्याची बाब समोर आली आहे.
आळंदी येथून खासगी कोंचिग क्लासेसची एक सहल दिवेआगर येथे आली होती. यात ४८ जणांचा समावेश होता. दिवेआगर समुद्र किनाऱ्यावर सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास यातील काही विद्यार्थी समुद्रात स्नानासाठी उतरले. मात्र पाण्याचा प्रवाह आणि खोलीचा अंदाज न आल्याने यातील आठ विद्यार्थी बुडाले, स्थानिकांनी त्यांचा शोध घेऊन सर्वांना बाहेर काढले मात्र दुर्दैवाने तोवर सर्व आठही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता.
या दुर्घटनेमुळे दिवेआगर समुद्र किनाऱ्यावरील पर्यटकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा प्रकर्षाने समोर आला आहे. विद्यार्थ्यांना वेळेत धोक्याची सूचना दिली गेली असती तर आणि वेळेत मदत मिळाली असती तर ही दुर्घटना टाळता आली असती असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
घटना घडली तेव्हा दिवेआगर समुद्र किनाऱ्यावर जिवरक्षक तैनात नव्हते. समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांना धोक्याची सुचना देणारी कुठलिही यंत्रणा अस्तित्वात नव्हती. बचाव कार्यासाठी उपलब्ध साधनेही त्या ठिकाणी उपलब्ध नव्हती. रिंग बोया, रोबोटीक बोया, लाईफ जॅकेट, दोरी या सारखी साधनेही उपलब्ध नव्हती. त्यामुळे समुद्रात बुडणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेवर मदत मिळू शकली नाही. त्यामुळे या दुर्घटनेची दखल घेऊन समुद्र किनाऱ्यावर मदत व बचाव कार्यासाठी यंत्रणा तैनात ठेवावी आणि बचाव पथकांना आवश्यक संसाधने उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी पर्यटक आणि स्थानिकांनी केली आहे.
रायगड जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांना दरवर्षी सरासरी पाच ते सहा लाख पर्यटक भेट देत असतात. यातील बहूतांश पर्यटकांना समुद्रातील पाणी आणि त्याच्या प्रवाहांचा अंदाज नसतो. त्यामुळे गोव्याच्या धर्तीवर कोकणातील समुद्र किनाऱ्यांवर सुरक्षा व्यवस्था करणे गरजेच आहे. –
पर्यटक बुडण्याची कारणे कोणती…
१ पाण्याच्या प्रवाह आणि खोलीचा अंदाज न येणे
२ स्थानिकांच्या सुचनांकडे दुर्लक्ष करणे
३ पर्यटकांचा अतिउत्साह
कोणत्या उपाय योजना गरजेच्या
- समुद्रकिनाऱ्यावर जीवरक्षकांची नेमणूक
- धोक्याची सुचना देणारी यंत्रणा आणि ध्वनीप्रक्षेपक
- समुद्रस्नानासाठी ठरावीक भागाचे आरक्षण
- लाईफ जॅकेट्स, सर्च लाईट, लाईफ बोट, रिंग बोया उपलब्ध करून देणे
समुद्र किनाऱ्यांवर जिवरक्षक ठेवणे आवश्यक आहे, ते उपलब्ध झाले तर अशा दुर्घटना टाळता येऊ शकतील, त्यासाठी आम्ही शासनस्तरावर पाठपुरावा करत आहोत. – विजय तोडणकर, सरपंच.
