Diveagar Drowning Incident Alandi Winners Academy Students Death: रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध दिवेआगार समुद्रकिनारी बुडून मृत्यू पावलेल्या आठ विद्यार्थ्यांपैकी प्रणव रामदास बनसोडे (वय १७) याच्या अंत्यसंस्कारावेळी त्याचा बालमित्र सोहम गोरे याला अश्रू अनावर झाले होते. आळंदी येथील रहिवासी असलेल्या इयत्ता ११वी (विज्ञान शाखा) मध्ये शिकणाऱ्या सोहमने या भीषण दुर्घटनेचा थरारक अनुभव कथन केला. “मला पोहता येतं; पण समुद्राच्या खारट पाण्यात पोहायला आवडत नाही, म्हणून मी पाण्यात उतरलो नाही आणि माझा जीव वाचला,” अशा शब्दांत सोहमने त्या दिवसाची आठवण द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितली.

मृत्यू पावलेले सर्व आठ विद्यार्थी आळंदी येथील ‘विनर्स अ‍ॅकॅडमी’ या खासगी कोचिंग क्लासेसचे होते. या क्लासने रायगड किल्ला आणि दिवेआगार समुद्रकिनारा अशी एकदिवसीय सहल आयोजित केली होती.

कशी घडली दुर्घटना?

सोहमने सांगितले, “प्रणव आणि मी शाळेपासूनचे मित्र होतो. आम्ही दोघेही ‘विनर्स अ‍ॅकॅडमी’त शिकत होतो. सहलीसाठी इच्छुकांना पालकांचे संमतीपत्र आणण्यास सांगितले होते. त्यानुसार २५ मुले आणि १७ मुली असे एकूण ४२ विद्यार्थी गुरुवारी पहाटे तीन वाजता एकत्र जमलो. आमच्याबरोबर दोन शिक्षक आणि तीन शिक्षिका होत्या. आम्ही आधी बसने रायगड किल्ल्यावर पोहोचलो. तिथे रोप-वे बंद असल्याने चालत वर गेलो. दुपारी दोनच्या सुमारास गड उतरून एका हॉटेलमध्ये जेवण केले आणि दिवेआगारच्या दिशेने निघालो.”

“सायंकाळी पाचच्या सुमारास आम्ही समुद्रकिनारी पोहोचलो. ज्यांना पोहता येत होते, त्यांनी समुद्रात उतरावे, बाकी इतरांनी किनाऱ्यावरच थांबावे, अशी सूचना शिक्षकांनी दिली. शिक्षकही मुलांबरोबर पाण्यात उतरले होते. विद्यार्थिनी किनाऱ्याजवळ कमी पाण्यात खेळत होत्या. मला पोहता येत असूनही खारट पाण्याची आवड नसल्याने मी बाहेरच थांबलो,” असे सोहम म्हणाला.

पाहता पाहता आठ जण बुडाले

पुढे घडलेला प्रसंग सांगताना सोहम म्हणाला, “सर्व मुले शिक्षकांबरोबर कमरेइतक्याच पाण्यात होती, फार खोल गेलेली नव्हती. मात्र काही मिनिटांतच पोलीस आणि वॉटर स्पोर्ट्स कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू झाली. जवळ जाऊन पाहिले असता माझे मित्र बुडत असल्याचे लक्षात आले. आमचे शिक्षक अमर अडक आणि मृणाल नारखेडे यांच्यासह उत्तम पोहणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी बुडणाऱ्या मित्रांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. काहींना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले, मात्र प्रणवसह आठ मित्रांचा दुर्दैवी अंत झाला. त्या समुद्रकिनारी कोणताही धोक्याचा इशारा देणारा फलक, जीवरक्षक किंवा लाईफ जॅकेटची सुविधा उपलब्ध नव्हती.”

घटनेनंतर सोहमने वडील गोविंद गोरे यांना फोन करून माहिती दिली. धास्तावलेल्या वडिलांनी खात्री करण्यासाठी मुलाशी थेट व्हिडिओ कॉलवर संपर्क साधला. शुक्रवारी पहाटे सहाच्या सुमारास इतर विद्यार्थी व शिक्षकांसह सोहम बसने आळंदीत परतला. दरम्यान, स्थानिक रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर रायगड पोलिसांनी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले.

आळंदीत कडकडीत बंद, शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

या भीषण दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शुक्रवारी (दि. २ ऑक्टोबर) तीर्थक्षेत्र आळंदीत कडकडीत बंद पाळण्यात आला. आळंदीचे रहिवासी असलेले प्रणव बनसोडे, सुमित अहिरे, कैवल्य वासनकर आणि तन्मय वाहिले यांच्यावर आळंदीतील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

राजवीर वहिले आणि सोहम तुकाराम भांडवलकर यांच्या पार्थिवावर आळंदीजवळच असलेल्या केळगाव येथे अंत्यसंस्कार झाले. चऱ्होली बुद्रुक येथील रहिवासी असलेल्या यश किरण वानखेडे याच्यावर त्याच्या अमरावती येथील मूळ गावी, तर कौस्तुभ संदीप दौंड याच्या पार्थिवावर अहिल्यानगर जिल्ह्यातील त्याच्या मूळ गावी अंत्यसंस्कार पार पडले.

विनर्स अ‍ॅकॅडमीबाहेर पोलीस बंदोबस्त

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘विनर्स अकॅडमी’ ही आळंदीतील एका इमारतीत चालवली जाणारी खासगी शिकवणी असून, तिथे ११वी आणि १२वीचे सुमारे १०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शुक्रवारी हा क्लास बंद ठेवण्यात आला होता, तसेच खबरदारीचा उपाय म्हणून क्लासच्या आवारात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या प्रकरणी संबंधित कोचिंग क्लासविरोधात अद्याप कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही, अशी माहिती आळंदी पोलिसांनी दिली.