अलिबाग- दिवेआगर येथील दुर्घटनेत आठ विद्यार्थ्यांच्या दुर्दैवीमृत्यूनंतर राज्यसशासनाला जाग आली आहे. समुद्र किनाऱ्यांवरील पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पावले उचलली आहेत. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी समुद्र किनाऱ्यांवर रोबोटीक बोया आणि गृहरक्षक दलाचे जवान तैनात केले जाणार
दिवेआगर समुद्र किनाऱ्यावर पुण्यातील आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. त्याआधी रत्नागिरीतील गणपती पुळे येथील समुद्र किनाऱ्यांवर पाच पर्यटक दगावले होते. रत्नागिरीतील नाणार खाडीत कालवे पकडण्यासाठी गेल्या चार भावंडाचा बुडून मृत्यू झाला. वारंवार घडणाऱ्या या घटनांची दखल घेूऊन राज्यसरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने कोकणातील समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आता रोबोटीक बोया उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार रायगड जिल्ह्यासाठी पाच रोबोटीक बोया प्राप्त झाले आहेत. ज्यांचे लोकार्पण आज पालकमंत्री भरत गोगावले, जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक आंचल दलाल आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
अलिबाग, मुरुड आणि श्रीवर्धन नगरपालिकांना समुद्र किनाऱ्यांवरील पर्यटकांच्या सुरक्षेसाठी यातील तीन रोबोटीक बोया उपलब्ध करून दिले आहेत. तर दिवेआगर आणि काशिद ग्रामपंचायतींना प्रत्येक एक रोबोटीक बोया उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यापुर्वी रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नागाव, काशिद आणि हरीहरेश्वर समुद्र किनाऱ्यांसाठी तीन रोबोटीक बोया उपलब्ध करून दिले आहेत. जामुळे दहाहून अधिक पर्यटकांचे जीव वाचले आहेत. पर्यटकांच्या सुरक्षेत या रोबोटीक बोयांची उपयुक्तता लक्षात घेऊन कोकणातील समुद्र किनाऱ्यांसाठी रोबोटीक बोया उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, रोबोटीक बोया बरोबर समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आता होमगार्ड्स अर्थात गृहरक्षक बलाचे जवानही उपलब्ध करून दिले जाणार आहेत. १७५ जवान रायगड जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांवर तैनात केले जाणार आहेत. बुडणाऱ्या पर्यटकांचे जीव कसे वाचवायचे यासाठी त्यांना प्रशिक्षणही दिले जाणार आहे अशी माहिती यावेळी पालकमंत्री गोगावले यांनी दिली.
रोबोटीक बोया म्हणजे काय ?
रोबोटीक बोया अर्थात रोबोटीक वॉटर क्राफ्ट हे स्वयंमचलित यंत्र आहे. जे रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून वापरले जाऊ शकते. समुद्रकिनाऱ्यावर भरती ओहोटी दरम्यान उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये तात्काळ मदत पोहोचवण्यासाठी हे अत्यंत उपयुक्त साधन आहे. हे यंत्र पाण्यात अडकलेल्या व्यक्तींपर्यंत वेगाने पोहोचून त्यांना सुरक्षित किनाऱ्यावर आणण्यास सक्षम आहे. एका वेळी २०० किलो ग्रॅम वजन ओढून आणण्याची क्षमता या यंत्रात असते. त्यामुळे एकाच वेळी दोन व्यक्तींना वाचवणे शक्य होऊ शकते.
