अलिबाग- तुकाराम मुंढे यांची दिव्यांग मंत्रालयातून करण्यात आलेली बदली तातडीने रद्द करा या मागणीसाठी दिव्यांग संघर्ष समितीने गुरुवारी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मुंढे यांच्या बदलीचा निर्णय तातडीने मागे घ्यावा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

दिव्यांग विभागाचा पदभार स्विकारल्या पासून तुकाराम मुंढे यांनी विभागाच्या कामकाजात मोठे फेरबदल केले. जे दिव्यांचगांच्या हिताचे होते. मागील ३० ३५ वर्ष दिव्यांग आयुक्तालय, दिव्यांग शाळा आणि कार्यशाळा एवढ्यांचेच कामकाज होत होते. मुंढे यांनी विभागाच्या कामकाजाची व्याप्ती वाढवली. दिव्यांगांचे खोटे दाखले घेऊन काही मंडळी फायदा घेत होते. यांचा शोध सुरु करून खोटे लाभ घेऊन लाभ घेणाऱ्यांचा शोध सुरू केला. त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित केली.

पूर्वी दिव्यांगांना शासकीय लाभासाठी शासकीय कार्यालयाकडे खेटे मारावे लागत होते. परंतु दिव्यांग मंत्रालयाच्या माध्यमातुन दिव्यांगांसाठी अॅप तयार करुन घरबसल्या समस्यांचे निवारण करण्याची व्यवस्था केली. २४ तासात तक्रारींचे निवारण करण्याची व्यवस्था केली. विभागाचे काम कागदविरहीत आणि ऑनलाईन केले.

रोजगारासाठी टूल किट योजना , दिव्यांग अव्यंग विवाह योजना, दिव्यांग दिव्यांग विवाह योजना इत्यादी विविध लाभांच्या योजना घरबसल्या देण्याचे काम केले. त्यामुळे खऱ्या अर्थाने दिव्यांगांचे पुनर्वसन होईल अशी आशा बाळगली असतानाच दिव्यांगांसाठी दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी कार्यरत असणाऱ्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची अनाकलनीय पध्दतीने बदली करण्यात आली. त्यामुळे दिव्यांगांमध्ये असंतोष पसरलेला आहे.

ही बाब लक्षात घेऊन तुकाराम मुंढे यांची बदली तात्काळ रद्द करण्यात यावी अशी मागणी रायगडच्या दिव्यांग संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली. बदली रद्द झाली नाही तर आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला. साईनाथ पवार, बी जी पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकडो दिव्यांग बांधव या मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.