महाराष्ट्रात डीजे आणि लाऊड स्पीकर्सचा मुद्दा हा २४ ऑगस्टपासून म्हणजे विद्यानंद बापट यांनी पुण्यातल्या सर्वसाधारण सभेत आवाज उठवल्यापासून चर्चेत आला आहे. दरम्यान गणेश चतुर्थीच्या दिवशीच रायगडमधल्या एका गावाची बातमी समोर आली आहे. या गावाने गिधांना त्रास होऊ नये म्हणून डीजे बंदीचा निर्णय घेतला आहे. बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळाने पोस्ट करत ही माहिती दिली आहे.
काय आहे बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळाची पोस्ट?
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील चिरगाव (बागेची वाडी) हे गाव महाराष्ट्राचे एकमेव ‘गिधाडांचे गाव’ म्हणून प्रसिद्ध आहे. येथे घरांच्या मागच्या परसात गिधाडांचा मोठा वावर असतो. गावकऱ्यांनी गिधाडांच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय घेतला आहे. गिधाडांच्या घरटांना आणि अधिवासाला मोठा आवाज त्रासदायक ठरतो. त्यामुळे या गावात लग्न किंवा इतर समारंभांमध्ये डीजे (DJ) आणि बँजो वाजवण्यावर पूर्ण बंदी आहे. गावकऱ्यांनी निसर्ग आणि पक्ष्यांच्या रक्षणासाठी हा आदर्श नियम पाळला आहे. स्थानिकांच्या प्रयत्नांमुळे येथील गिधाडांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. गिधाडे ही निसर्गाची नैसर्गिक स्वच्छता करणारी यंत्रणा मानली जाते. मृत प्राण्यांचे अवशेष वेगाने नष्ट करून ती रोगांचा प्रसार रोखतात. या गावाने घेतलेला निर्णय इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.
मागच्या २५ वर्षांपासून डीजे आणि बँजो बंदी
मागच्या २५ वर्षांपासून रायगडच्या चिरगावात गिधाडांच्या संवर्धनासाठी डीजे आणि बँजो बंदी करण्यात आली आहे. चिरगाव या गावातील जंगलात गिधाडांनी त्यांची घरटी बांधली आहेत. त्या घरट्यांना त्रास होऊ नये आणि गिधांडांचं संवर्धन व्हावं म्हणून चिरगावाने हा निर्णय घेतला आहे. सध्याच्या घडीला बेसुमार जंगलतोड, गिधाडांच्या घरट्यांना न मिळणारी जागा, डायक्लोफेनाक सारख्या औषधांचा वापर या सगळ्यांमुळे गिधाडांची संख्या घटली आहे. चिरगाव या ठिकाणी मात्र गावकऱ्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे गिधाडांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. १९९९ ते २००० या कालावधीत चिरगावात गिधाडांची घरटी कमी झाली होती तसंच फक्त २० ते २२ गिधाडं उरली होती. ज्यानंतर गिधाडांच्या संवर्धनासाठी या गावाने एकत्र येऊन डीजेबंदी आणि बँजो बंदीचा निर्णय घेतला आहे. गावामध्ये हजारो झाडंही लावण्यात आली आहेत. तसंच गिधाडांना पुरेसं अन्न मिळालं पाहिजे म्हणून आसपासच्या गावांमध्ये मृत जनावरांची माहिती द्या असंही आवाहन ग्रामस्थांनी इतर गावांना केलं आहे. या गावात ज्या गिधाडांच्या पिल्लांना मांस खाण्याची कमतरता भासते त्यांच्यासाठी ती व्यवस्थाही करण्यात येते. गावकऱ्यांनी घेतलेल्या या समंजस निर्णयामुळे गिधाडांचं संगोपन होतं आहे.
