Dnyaneshwar Chavan Civil Judge Success Story: मराठवाड्यातील जिल्ह्यांमधील अनेक लोक दरवर्षी ऊस तोडणी करण्यासाठी इतर जिल्ह्यांत स्थलांतरित होत असतात. परभणी जिल्ह्यातील गणेश नगर तांड्यातील ज्ञानेश्वर चव्हाण यांचेही घर ऊस तोडणीमुळे नेहमी मोकळं राहायचं. बंजारा समाजातून येणारं चव्हाण कुटुंब पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतरित व्हायचे. अशावेळी ज्ञानेश्वर यांना लहानपणापासूनच बराच काळ आई-वडिलांच्या छत्राविना काढावा लागला. गरीबी, सामाजिक मागासलेपण, शिक्षणाचा अभाव अशा अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत ज्ञानेश्वर चव्हाण यांनी २७ व्या वर्षी दिवाणी न्यायाधीश पदापर्यंत मजल गाठली आहे. तांडा ते कोर्ट… हा प्रवास चव्हाण यांनी कसा केला, याची प्रेरणादायी कहाणी जाणून घेऊ.
चव्हाण यांनी गावातील जिल्हा परिषदेची शाळा, त्यानंतर परभणी येथील आश्रम शाळा आणि गावापासून दूर असलेल्या आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयातून पुढील शिक्षण घेतले. घरातील हलाखीच्या परिस्थितीमुळे हाच एकमेव मार्ग त्यांच्याकडे उपलब्ध होता.
दहावीपर्यंत यशस्वीरित्या शिक्षण घेणारे ज्ञानेश्वर चव्हाण हे त्यांच्या कुटुंबातील पहिलेच सदस्य. आपला मुलगा स्वतःहून शिकतोय, हे पाहून पालकांनाही आनंद होता. यामुळे त्यांनी त्याला पुढील शिक्षणासाठी पाठिंबा दिला. तुला जर पुढे शिकायचे असेल आणि काहीतरी करून दाखवायचे असेल तर आम्ही अहोरात्र झटू पण तुझ्या शिक्षणाला काही कमी पडू देणार नाही, असा विश्वास पालकांनी टाकला आणि चव्हाण यांनी हा विश्वास सार्थ करून दाखवला.
ज्ञानेश्वर चव्हाण यांनी अलीकडेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेतल्या गेलेल्या महाराष्ट्र दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ विभाग) आणि प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी (JMFC) परीक्षेत यश मिळवले आहे.

बी.कॉमनंतर झाली कायद्याच्या शिक्षणाची ओळख
दहावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर चव्हाण यांनी पुण्याच्या मॉर्डन कॉलेजमधून बी.कॉमपर्यंतचे शिक्षण घेतले. द इंडियन एक्सप्रेसशी बोलत असताना त्यांनी सांगितले, “बी.कॉमनंतर नोकरी करण्याचा निर्णय होता. मात्र एवढ्या शिक्षणात कमी पगाराच्या नोकऱ्या मिळत होत्या. माझ्या काही मित्रांनी एलएलबीसाठी प्रवेश घेतला होता. यामुळे मीही एलएलबी करण्याचा निर्णय पक्का केला. कदाचित यामुळे आर्थिक स्थैर्य प्राप्त होऊ शकेल, अशी त्यामागे भावना होती.”
‘नवलमल फिरोदिया लॉ कॉलेज’मधून एलएलबी आणि त्यानंतर मुंबई विद्यापीठातून एलएलएमचे शिक्षण घेतले. एलएलबीचे शिक्षण घेत असताना मी पहिल्यांदा न्यायिक सेवांबद्दल ऐकले आणि मला त्यात रस वाटू लागला. मला काहीतरी मोठे करून दाखवायचे होते. त्यामुळे मी न्यायिक सेवा परीक्षांची तयारी करण्याचा निर्णय घेतला, असेही चव्हाण यांनी सांगितले.
२०२२ साली एक ध्येय डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ विभाग) आणि प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. एमपीएससी तर्फे होणारी न्यायाधीश आणि जेएमएफसी परीक्षा ही राज्यातील सर्वात स्पर्धात्मक न्यायिक भरती परीक्षांपैकी एक आहे. यात पूर्व, मुख्य आणि वैयक्तिक मुलाखत असे तीन टप्पे असतात.

ज्ञानेश्वर चव्हाण यांनी पहिल्याच प्रयत्नात २०२२ साली परीक्षेचे तीनही टप्पे पार करून मुलाखतीपर्यंतचा टप्पा गाठला. पण अंतिम गुणवत्ता यादीत त्यांचे स्थान थोडक्यात हुकले. या धक्क्यातून सावरत चव्हाण यांनी पुन्हा एकदा परीक्षा देण्याचा विचार केला. आधीच्या प्रयत्नात कोणत्या कमतरता राहिल्या, हे जोखून त्यांनी यावेळी पूर्ण तयारीनिशी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.
वडिलांचे निधन, आर्थिक अडचणी
पहिल्या अपयशानंतर चव्हाण दुसऱ्या प्रयत्नांच्या तयारी गढून गेले. मात्र या काळात त्यांना एक मोठा धक्का बसला. २०२३ मध्ये त्यांच्या वडिलांचे निधन झाले. याबद्दल सांगताना ज्ञानेश्वर चव्हाण म्हणाले, वडिलांच्या निधनानंतर मी भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या खचून गेलो. ज्यासाठी मी पूर्ण ताकदीनिशी तयारी करत होतो, ते ध्येय आता दूर वाटू लागले. पण इतरांनी मला भक्कम साथ दिली.
चव्हाण सांगतात, माझे मित्र अजय राऊत आणि संकेत लोणेरे यांनी माझ्या राहण्याची सोय केली. तसेच अभ्यासाचे साहित्यही पुरवले. पुण्यातील सदाशिव पेठेत कोचिंग इन्स्टिट्यूट चालविणारे माझे शिक्षक गणेश शिरसाठ यांनी विनाशुल्क वर्गात उपस्थित राहण्याची परवानगी दिली. परभणीत घरखर्च सांभाळण्यासाठी मोठ्या भावांनी शेतमजुरीची कामे केली.
माझ्या मित्रांच्या, जवळच्या लोकांच्या पाठिंब्याशिवाय मी काहीही करू शकलो नसतो. माझ्यासमोरच्या अडचणी मित्र, भाऊ यांच्यामुळे सुटल्या. ज्यामुळे मी पूर्णपणे अभ्यासावर लक्ष केंद्रीत केले. ज्यामुळे मला हे यश मिळाले.

काटेकोर नियोजन आणि शिस्त
एकीकडे वडिलांच्या निधनाचे दुःख आणि दुसरीकडे कुटुंबाला हलाखीच्या परिस्थितीतून बाहेर काढण्याची जिद्द. यासाठी चव्हाण यांनी कठोर दिनचर्या आखली आणि त्याचे काटेकोर पालन केले. चव्हाण सकाळी ७ वाजताच अभ्यासिकेत पोहोचायचे. तिथे ९ वाजेपर्यंत अभ्यास आणि त्यानंतर नाश्ता. पुन्हा दुपारी १ वाजेपर्यंत अभ्यास आणि त्यानंतर जेवण. दुपारी थोडा आराम केल्यानंतर २ ते ७ अभ्यास आणि रात्रीच्या जेवणानंतर ११ वाजेपर्यंत पुन्हा अभ्यास.
चव्हाण म्हणतात की, २०२३ ते २०२५ या काळात मी सोशल मीडियापासून पूर्णपणे दूर राहिलो. अभ्यासात व्यत्यय येईल, अशी प्रत्येक गोष्ट टाळली. तसेच माझ्याकडे गमावण्यासारखे काहीही नव्हते. या विचाराने मी स्वतःला अभ्यासात झोकून दिले.
ऑक्टोबर २०२५ मध्ये, चव्हाण यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात न्यायिक संशोधक सहाय्यक म्हणून निवड झाली. यावरून त्यांची तयारी योग्य दिशेने सुरू असल्याचे संकेत मिळाले. १० एप्रिल रोजी एमपीएससीच्या दिवाणी न्यायाधीश आणि जेएमएफसी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. गुणवत्ता यादीत ज्ञानेश्वर चव्हाण यांचा १२ वा क्रमांक लागला.
चव्हाण म्हणतात की, माझा प्रवास आता इथेच संपत नाही. वंचित पार्श्वभूमी असलेल्या आणि संसाधनांची कमतरतेचा सामना करणाऱ्या इतर विद्यार्थ्यांना मला भविष्यात मार्गदर्शन करायचे आहे. जेणेकरून माझ्यासारखे यश त्यांनाही मिळू शकेल.
